Wed, Jan 16, 2019 21:45होमपेज › Satara › बेकायदा वाळू वाहतूक 

बेकायदा वाळू वाहतूक 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औंध : वार्ताहर

मंगळवारी रात्री वडूज ते औंध रस्त्त्यावरील पळशी गावानजीकच्या फाट्यावर वडूजकडून कराडकडे तसेच वरूड ते औंधमार्गे कराडकडे अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्‍या 6  डंपरवर धडक कारवाई करुन महसूल विभागाने डंपर, वाळूसह सुमारे 30 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.  

मंगळवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशील बेल्लेकर, नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे, मंडलाधिकारी प्रताप राऊत, विजय पाटील, किशोर घनवट, शरद सानप, अभय शिंदे, अजित लोखंडे, धनंजय  तडवळेकर यांच्या पथकाने  पळशी फाटा व औंध वरुड रस्त्यावर सापळा लावून वाळूने भरलेले 6 डंपर तसेच एक मोकळा ट्रक असा तीस लाखाचा ऐवज जप्त केला.

अचानक झालेल्या कारवाईमुळे वाळू सम्राटांचे धाबे दणाणले. सध्या सि. कुरोली, औंध, चौकीचा आंबा तसेच गोपूज, पुसेसावळीमार्गे ही वाळू वाहतूक राजरोसपणे सुरू होती. महसूल विभागाच्या धडक कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.

दरम्यान यामधील जप्त केलेले चार वाळू डंपर वडूज तहसील कार्यालय तर दोन डंपर औंध पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आले आहेत. बुधवारी उशीरापर्यंत जप्त केलेल्या डंपरचे पंचनामे न झाल्याने पुढे नेमकी काय कारवाई झाली हे समजू शकले नाही.