Fri, Nov 16, 2018 00:19



होमपेज › Satara › बेकायदा उत्खननप्रकरणी गुन्हा

बेकायदा उत्खननप्रकरणी गुन्हा

Published On: Mar 07 2018 11:27PM | Last Updated: Mar 07 2018 11:10PM



कराड : प्रतिनिधी 

पाडळी केसे (ता. कराड) गावच्या हद्दीत खाणपट्टीवर गौण खनिज उत्खननाची मुदत 2014 साली संपल्यानंतरही डबर उत्खनन करत शासनाची तब्बल 2 लाख 46 हजारांची रॉयल्टी बुडवण्यात आल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंडलाधिकार्‍यांच्या तक्रारीवरून कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रमेश नारायण मोहिते (मलकापूर), अनिल बाळकृष्ण पाटील (वारूंजी), रवींद्र सोपानराव जाधव (कराड), आकाश जयवंत जाधव (सुपने) आणि जनार्दन केशव माने (कापील) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नवींद्र शिवराम भांदिर्गे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून ते सुपने विभागाचे मंडलाधिकारी म्हणून काम पाहतात.

पाडळी केसे गावच्या हद्दीत शासकीय गट नंबर 351 मध्ये सातार्‍याचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी खाणपट्टा मंजूर केला होता. याची मुदत 2014 सालीच संपुष्टात आली आहे. मात्र, त्यानंतरही अवैधरित्या डबर उत्खनन सुरूच होते. त्यानंतर भांदिर्गे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामे करत त्याचा अहवाल तहसिलदारांना सादर केला होता. उत्खनन त्यानंतर तहसिलदारांनी याप्रकरणी 616 ब्रासचे अनधिकृत उत्खनन केल्याप्रकरणी तसेच पर्यावरण प्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानुसार प्रदूषण व पर्यावरण कायदा 1969 तसेच खाणी व खणिजे अधिनियमानुसार भांदिर्गे यांनी पाच जणांविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सखोल तपास होऊन दोषींवर कारवाई होणार का?

मुदत संपल्यानंतरही बेकायदा डबर उत्खनन सुरू होते, हे आता समोर आले आहे. मात्र, मुदत संपल्याची माहिती कोणत्याच अधिकार्‍याला नव्हती, हे कसे मानायचे? त्याचबरोबर यामागे कोणाचा वरदहस्त होता का? हेही समोर येणे आवश्यक असून पोलिसांकडून आता सखोल तपास होणे आवश्यक आहे.