Mon, May 27, 2019 08:55होमपेज › Satara › तळीराम ठरताहेत बनवडीकरांची डोकेदुखी

तळीराम ठरताहेत बनवडीकरांची डोकेदुखी

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 14 2018 8:15PMकोपर्डे हवेली : जयवंत नलवडे

बनवडीमध्ये (ता. कराड) अवैध दारू विक्रीला उधाण आले असून दिवसभर तळीरामांचा वावर सुरू असतो दारू पिऊन धुंद झालेल्यांना चालताना रस्ताही अपुराच पडू लागला आहे. त्यामुळे दिवसाही महिलांना, लहान मुलांना घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.

शासनस्तरावर विविध क्षेत्रामध्ये बनवडीचे नाव पूर्ण महाराष्ट्रभर लौकिक मिळवला आहे. परंतु याच बनवडीत अवैध दारू विक्री गेल्या अनेक वर्षांपासून उजळमाथ्याने होत आहे. त्यामुळे या अवैध दारूविक्रेत्यांना कुणाचे अभय आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र विनाकारण नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कराडपासून केवळ तीन कि. मी. अंतरावर असलेले बनवडी गाव कराड शहर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असून ते ओगलेवाडी ओ पी ला जोडले आहे.

बनवडीचे नागरीकरण झपाट्याने वाढत असून शांत आणि सर्व सुविधा उपलब्ध असल्याने सुशिक्षित लोकांची रहाण्यासाठी पहिली पसंती बनवडीस मिळत आहे. परंतु अलीकडच्या काळात याठिकाणी अवैध व्यवसायांत वाढ होत चालली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुख्य रस्त्यापासून पाचशे मीटर अंतरामध्ये परवानाधारक दारूविक्रेत्यांना विक्री करण्यास मनाईचा कायदा केला आहे, तसा आदेशही काढला आहे परंतु बनवडी येथे होत असलेली दारू विक्री ही कायद्याच्या कुठल्याच चौकटीत बसत नसून ती बेकायदा आहे. तरीही खुलेआम  होत असलेल्या या व्यवसायाला अनेक वर्षापासून पायबंद का घातला जात नाही ? हा संशोधनाचा विषय असुन याबाबत उत्पादन शुल्क विभाग आणि कायद्याचे रक्षण करणार्‍या पोलिसाकडेच तरी याचे उत्तर आहे का? असा सामान्य जनतेचा सवाल आहे.

बनवडीत सध्या जोमात सुरू असलेल्या दारुधंद्याची चर्चा सुरू असून संपूर्ण गावामध्ये पहाटेपासून तळीरामांच्या वार्‍या सुरू होतात. मुलांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. पहाटे तीन वाजल्यापासून दारूड्यांच्या रांगा लागत आहेत तर दिवसभर बनवडीसह आजूबाजूच्या पार्ले, उत्तर पार्ले, कोपर्डे, विरवडे, एम एसईबी सैदापूर या ठिकाणाहूनही लोक दारू खरेदीसाठी येत असतात ते रात्री बारा-एकपर्यंत यांचा वावर असतो. हा दारू व्यवसाय बनवडीमध्ये कॉलनीत मध्यावधी मुख्य रस्त्याच्या कडेला सुरू आहे. याबाबत ओगलेवाडी पोलिसांना माहिती देऊनही कार्यवाही होत नाही ही आश्‍चर्याची बाब आहे.

बनवडीत बेकायदेशीर दारूविक्री सूरु आहे दारु पिऊन रस्त्याने फिरणार्‍यांची संख्या वाढत आहे संध्याकाळ झाली की लहान मुलांना महिलांना व निर्व्यसनी लोकांना घरातून बाहेर पडणे अडचणीचे बनले आहे. दारुबंदीचा कायदा असताना राजरोजपणे दारुविक्री होत आहे. पोलिस ठाण्यापासूनपासून केवळ तीन ते चार कि. मी. अंतरावर ही दारुविक्री सुरू  आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जेथे ज्ञानदानाचे काम चालते देशाचे भविष्य घडवण्याचे कार्य केले जाते जे भविष्यात देशाचा आधारस्तंभ बनणार  आहेत अशा ज्ञानमंदिरासमोरच बेकायदा दारू व्यवसायाची पाळेमुळे खोल रोवली आहेत. याचा विपरीत परीणाम बालमनावर होत असतो तरीही याकडे सोयस्कर रीत्या दुर्लक्ष केले जात  असल्याने नागरिकांतून संताप व्यक्‍त होत आहे.