होमपेज › Satara › नामानिराळा राहिलेला ‘वि’शेष ‘नायक’ कोण?

नामानिराळा राहिलेला ‘वि’शेष ‘नायक’ कोण?

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 23 2018 11:13PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरासह जिल्ह्यात खळबळ उडवून देणार्‍या बेकायदा गर्भपात औषध प्रकरणात (एमटीपी किट) आतापर्यंत पाच जणांनाच अटक झालेली असून त्यापुढे तपासच सरकला गेलेला नाही. या ‘एमटीपी किट’चा कोरेगाव तालुक्यात एक ‘वि’शेष ‘नायक’ लाभार्थी राहिला आहे. ‘एटीपी किट’ प्रकरण बाहेर आल्यानंतर चोरावर ‘मोर’ असलेल्याची ‘प्रथम’ जोरदार  चर्चा झाली; मात्र त्यातून सहीसलामत सुटण्यात त्याला ‘यश’ आले असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

मार्च महिन्यात सातारा तालुक्यातील हिरापूर येथे बेकायदा गर्भपात औषधाचा साठा सापडल्यानंतर वैद्यकीय व्यावसायिक क्षेत्रात खळबळ उडाली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतरही गुन्हा दाखल होण्यास तब्बल चार दिवसांचा कालावधी गेल्याने अनेक ‘अर्थ’पूर्ण व्यवहाराुच्या घडामोडींना वेग आला. सातारा तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी सुरुवातीलाच विजय सपकाळ, अमीर खान, प्रशांत शिंदे, विलास देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला. बिनधोकपणे गर्भपात औषधाचा साठा सापडत असताना अटकेची कोणावरही कारवाई होत नसल्याने त्याबाबत आश्‍चर्य निर्माण झाले.

अखेर हे प्रकरण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तथा ‘एलसीबी’कडे गेल्यानंतर कारवाईला वेग आला. ‘एलसीबी’ने याप्रकरणी बाळासाहेब देशमुख या मेडिकलमध्ये काम करणार्‍या कामगाराला पहिली अटक केली. या अटकेनंतर कारवाई तीव्र करत पोलिसांनी विलास देशमुख यालाही अटक  केली. दुर्देवाने मात्र उर्वरित तिघांपर्यंत ‘एलसीबी’ही पोहचू शकली नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनंतर उर्वरित संशयितांना अटक करण्यात आली.

‘एलसीबी’च्या तपासामध्ये विलास देशमुख हा प्रमुख सूत्रधार असल्याचे समोर आले. मात्र, या देशमुखाने गर्भपात औषधाचे किट कधीपासून विक्रीचा धंदा सुरु केला? ते कोणा कोणाला विकले आहे? एक किटमागे किती रुपये उकळले जात होते? याची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत. यामुळे या प्रकरणाचा फारसा तपास पुढे सरकला नाही. यातील विलास देशमुख हा किट पुरवत होता तर उर्वरित तिघेजण मागणीनुसार ते विक्री करत होते. हेच एक किट बाळासाहेब देशमुख याने घेतले असल्याचे तपासात समोर आले.

या सर्व घटना घडामोडी घडत असताना विलास देशमुखसह इतर संशयित पकडले जाण्याअगोदर व नंतर अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या आहेत. सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेकांनी बेकायदेशीररीत्या गर्भपात औषधाचे किट विकत घेतली आहेत. कोरेगाव तालुक्यातीलही एका पठ्ठ्याने दहा किटचा एक सेटच घेतला असल्याची चर्चा सुरु आहे. दहा किट घेतले गेल्याने व ते अवैधरितीने विकले गेल्याने ‘नायक’ म्हणून वावरत असणार्‍याची ओळख ‘खलनायक’ म्हणून होऊ लागली. गर्भपात औषधाचा साठा सापडल्यानंतर संबंध कोरेगाव तालुक्यात या ‘मोराची’ चर्चा सुरु झाल्यानंतर त्यालाही घाम फुटला. इकडे पोलिसांनी उकराउकरीला सुरुवात केल्यानंतर हे प्रकरण शांत होईपर्यंत मोबाईल स्विच ऑफ करुन घाबरलेल्या अवस्थेत राहत होता. यावेळी सहीसलामत सुटण्यासाठी अनेक मध्यस्थीही झाल्या.

दरम्यान, अद्याप ‘एलसीबी’चे पथक गर्भपात औषधाचा तपास करत आहेत. चार्जशीटसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु असून आतापर्यंत सापडलेले औषधच बेकायदेशीर असल्याचा रिपोर्ट आल्याने या प्रकरणात त्यासंबंधीचे कलम वाढवण्यात आले आहेे. चौघांवर व नंतर एकावर अशा पाचजणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे. यातील दोघांना जामीनही मंजूर झाला असून उर्वरित तिघेजण जेलमध्ये आहेत. यामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या आणखी मुळाशी जावे व जे जे दोषी असतील त्यांचा पर्दाफाश करावा, अशी अपेक्षा व्यक्‍त आहे. यामुळे पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष राहणार आहे.