Tue, Jun 02, 2020 01:19
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › साईबाबा मंदिराकडे पालिकेचे दुर्लक्ष

साईबाबा मंदिराकडे पालिकेचे दुर्लक्ष

Published On: Mar 26 2018 1:33AM | Last Updated: Mar 25 2018 11:01PMकराड : प्रतिभा राजे

कराडच्या साईभक्‍तांचे श्रध्देचे स्थान असणार्‍या दत्तचौकातील साई मंदिराच्या समस्यांकडे पालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हे पवित्र मंदिर दुगर्र्ंधीने अक्षरश: घेरलेले आहे. चौकातील चार ते पाच ठिकाणाहून येणार्‍या तसेच  खासगी हॉटेल्स, 

घरमालकांकडून येणारे सांडपाण्याचा पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने साईमंदिराभोवती दलदल निर्माण होत आहे. साईबाबाबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्येही या मंदिराकडे पालिकेचे दुर्लक्ष असल्याने साईभक्‍तांकडून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. ट्रस्टकडून वारंवार तोंडी, लेखी निवेदन देवूनही पालिका दुर्लक्ष करत आहे.

एकीकडे स्वच्छ सर्वेक्षणसाठी पालिकेकडून शहर स्वच्छ करण्याचे प्रयत्न होत आहेत तर शहरातील अनेक रस्तेही चकाचक होत आहेत असे असतानाच शहरातील पवित्र, श्रध्दास्थान असणारा हा मंदिर परिसरच दुर्लक्षित का राहिला आहे, असा प्रश्‍न नागरिकांना निर्माण होत आहे. शहरातील कार्वेनाका, मार्केटयार्ड, तहसिल कार्यालय, शाहूचौक, कराड शहर पोलिस ठाणे, स्टेट बँक, बसस्थानक परिसर, कब्रस्थान, दत्तचौक, पाटण कॉलनी या परिसरातून मोठ्या गटरद्वारे सांडपाणी श्री साईभक्‍त सेवा ट्रस्ट कराड या संस्थेच्या कराड शहर टी. पी. स्कीम नं. 1 मधील फायनल प्लॉट नं. 599 व सर्व्हे नं. 454 मध्ये श्री साईबाबा प्लॉटमध्ये आणून सोडण्यात आले आहे.

मंदिराच्या बाजूनेच हे पाणी वाहात असते. नगरपालिकेने मंदिराच्या पूर्व तसेच दक्षिण बाजूकडून येणार्‍या  नाल्याद्वारे सांडपाणी हे साचून राहिलेने त्याचा खतारा तसेच गाळ स्वरूपात साठलेले असून संपूर्ण नाले बुजून गेलेले आहेत. साई मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर असणार्‍या दुकानांचे सांडपाणी मंदिराकडे जात असल्याने याठिकाणच्या पुजार्‍यांनी मंदिर परिसराची केलेल्या स्वच्छतेस बाधा येते. तसेच दत्तचौकातून पाईपलाईन टाकताना रस्त्याची नासधूस होवून खड्डे पडून खराब झालेला रस्ता हा खडीकरण, करून देण्याबाबतचे आश्‍वासन पालिकेने ट्रस्टला दिले होते. पावसाळ्यात या रस्त्याच अवस्था अतिशय भयंकर होते. भक्‍तांना मंदिरात जाणेही मुश्किल होते. या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे तसेच या मंदिराचा‘ब’ वर्गात समावेश करावा, अशी मागणी ट्रस्टने अनेकदा केली आहे. 

साईप्रकल्प बांधकामात सांडपाण्याचा अडथळा

श्री साईबाबांच्या शताब्दी वर्षात ट्रस्टच्या माध्यमातून 5 एकर जागेत साईप्रकल्प उभारला जाणार आहे. यामध्ये साईमंदिर, ध्यानमंदिर, पारायण कक्ष,  अन्नछत्र, भक्‍तनिवास, आध्यात्मिक लायब्ररी, गो—शाळा, उद्यान, हॉस्पिटल आदी सुविधा करण्याचे नियोजन आहे. मात्र या सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने हा प्रकल्प उभा करता येणार नाही. हा प्रकल्प उभारल्यास कराडमध्ये प्रतिशिर्डी निर्माण होईल व शहराच्या वैभवात भर पडेल. मात्र अनेक अडथळ्यांना ट्रस्टला सामोरे जावे लागत आहे.

 

Tags : satara, karad news,  Sai temple, problem,