होमपेज › Satara › आ. शशिकांत शिंदे यांचा विधानसभेत इशारा : सरकारची भूमिका दुस्वासाची

जिल्ह्याला निधी न दिल्यास ताकद दाखवू

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:04PM

बुकमार्क करा

कोरेगाव : प्रतिनिधी 

राज्य शासनाची पश्‍चिम महाराष्ट्राबाबतची भूमिका दुस्वासाची असल्यामुळे निधीअभावी सातारा जिल्ह्यात अनुशेष निर्माण झाला आहे, असा आरोप आ. शशिकांत शिंदे यांनी विधानसभेत केला. शासनाने वीज मंडळाला मंजूर केलेल्या तीन हजार कोटींच्या निधीतून प्राधान्याने सातारा जिल्ह्याला तत्काळ निधी द्यावा. अन्यथा, आमचे नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार असहकार आंदोलनाच्या माध्यमातून ताकद दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी शासनाला दिला.

विजेसंदर्भातील प्रश्‍नांबाबतच्या चर्चेदरम्यान आमदार शिंदे यांनी विधीमंडळात जिल्ह्यातील प्रश्‍न मांडले. ते म्हणाले,  पश्‍चिम महाराष्ट्राबाबत दुस्वासाची भूमिका घेऊन शासन  विभागीय वाद करत आहे. शासनाच्या या भूमिकेमुळे निधीअभावी सातारा जिल्ह्यातील विजेसंदर्भातील समस्या गंभीर बनल्या आहेत. या प्रश्‍नी शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सातारा जिल्ह्यात वीज कंपनीच्या विरोधात हल्लाबोल मोर्चा काढला होता. 

आता आमचे नेते शरद पवार यांनी येत्या एक तारखेपासून असहकार आंदोलनाचा आदेश दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर  शासनाने वीज मंडळाला मंजूर केलेल्या तीन हजार कोटींच्या निधीतून प्राधान्याने सातारा जिल्ह्याला तत्काळ निधी द्यावा. अन्यथा, आम्ही असहकार आंदोलनाच्या माध्यमातून ताकद दाखवून देऊ. जिल्ह्यातील 106 सिंचन प्रकल्पांमध्ये सुप्रमा मंजूर झाल्याचा गाजावाजा शासनाने केला. परंतु सुप्रमा मंजूर करताना त्यासंदर्भातील आराखड्याला अद्यापही मंजुरी मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

शासनाने दोन लाख कोटींचे काढलेले कर्ज गेले कुठे? कोणत्याही विभागाकडून न्याय मिळत नाही. निधी जातो कोठे? शासनाने सामान्य शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करावी आणि स्ट्रॉबेरीसह विविध पिकांच्या नुकसानीबाबत शासनाने मदत जाहीर करावी. यासंदर्भात निर्णय न झाल्यास आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारू,असा इशारा आ. शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिला.