Sun, Jul 21, 2019 01:29होमपेज › Satara › मराठी माणूस पंतप्रधान झाल्यास आनंदच

मराठी माणूस पंतप्रधान झाल्यास आनंदच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

संदीप मोझर हे निश्‍चितपणे भविष्यात आमच्या पक्षासोबत येतील असा विश्‍वास व्यक्त करत मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, ही आमची पहिल्यापासून इच्छा आहे. पूर्वी कराडच्या व्यक्तींना ती संधी होती. मात्र त्यांना होता आले नाही. त्यामुळे आता कोणी मराठी माणूस पंतप्रधान झाल्यास आनंदच वाटेल, असे मत मनसे नेते, माजी आ. बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले आहे.

कराड उत्तर, कराड दक्षिणसह पाटण विधानसभा मतदारसंघातील मनसे कार्यकर्त्यांशी चर्चा करत बाळा नांदगावकर यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.संदीप मोझर यांना पक्षात घेऊ नये, यासाठी श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांनी स्वतः आपल्याशी संपर्क साधला होता. मात्र त्यानंतरही पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी मोझर यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी सोपवली होती. त्यांच्यावर पक्षाचा मोठा विश्‍वास होता. ज्या पक्षात मतभेद नाहीत, असा एक पक्ष दाखवा असा प्रतिप्रश्‍न उपस्थित करत मोझर यांनी माझ्यावर नाराजी व्यक्त केली, तरी मला त्याचे काहीच वाईट वाटत नाही.

पक्ष आमचे कुटूंब आहे आणि कुटुंबांत अशा गोष्टी घडतच असतात. सातार्‍यात राज ठाकरे यांनी सभा घेतली आणि मोझर यांच्याशी चर्चाही केली आहे. मोझर यांनीही कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्‍यांना राजीनामा न देता पक्षाचे काम सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच कदाचित मी चुकलोही असेन, असे सांगत संदीप मोझर हे निश्‍चितपणे आमच्या पक्षासोबत पुन्हा येतील, असा विश्‍वास नांदगावकर यांनी व्यक्त केला.

मराठी माणून पंतप्रधान व्हावा, ही आमची प्रथमपासून इच्छा आहे. पूर्वी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याकडे ती ताकद होती. मात्र त्यांना पंतप्रधान होता आले नव्हते. त्यामुळे आता जर कोणी मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आपणास निश्‍चितपणे आनंदच होईल. मात्र पक्ष प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या भेटीत राजकीय विषयच नव्हता. मुलाखतही घेतली गेली, तेव्हा खरी उत्तरे देणार असाल तरच मुलाखत घेऊ असे राज ठाकरे यांनी सांगितले होते. शरद पवार यांनी त्यास होकार दिल्यानंतरच ही मुलाखत झाली होती. त्यामुळे याकडे राजकीय द‍ृष्टीने पाहू नये, असे आवाहनही नांदगावकर यांनी केले.

त्याचबरोबर ‘मोदीमुक्त भारत’ हा संकल्प राज ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. त्यामुळे जर कोणी यासाठी प्रयत्न म्हणून राजकीय पक्षांची जुळवाजुळव करत असेल, तर ते चांगलेच असल्याचेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले. मात्र भविष्यात मनसे राष्ट्रवादीसोबत जाईल का? या प्रश्‍नाचे उत्तर देण्यासह याबाबत कोणतेही भाष्य करण्यास मात्र नांदगावकर यांनी स्पष्टपणे नकार दिला.

Tags : Satara, Satara News, Marathi, people, become, Prime Minister, will happy, Bala Nandgaonkar, Maharashtra Navnirman Sena


  •