Fri, Apr 26, 2019 15:45होमपेज › Satara › सावज टप्प्यात आले की, बाण सोडणार : ना. रामराजे

सावज टप्प्यात आले की, बाण सोडणार : ना. रामराजे

Published On: Aug 29 2018 12:18PM | Last Updated: Aug 29 2018 12:17PMसातारा : प्रतिनिधी

सातारच्या दोन राजघराण्याच्या मनोमिलनामध्ये मला काही पडायचे नाही. त्यांचे मनोमिलन करण्याइतपत मी मोठा नाही. सातारा तालुक्याच्या राजकारणात मला काही देणंघेणं नाही. उदयनराजेंमध्ये व माझ्यामध्ये  काही मोठा वाद नाही, पण तात्वीक मतभेद आहेत. महिन्यापूर्वी सर्किट हाऊसवर जो प्रकार घडला तो मी  विसरलो नाही. सावज टप्प्यात आले की, बाण सोडणार, असा इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पक्षाचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता दिला. 

काल मुंबई येथे राष्ट्रवादी पक्षाची बैठक पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला सातारा जिल्ह्यातून ना. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे हे  उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी आ. शशिकांत शिंदे यांनाही बैठकीत सातारा लोकसभा उमेदवारी संदर्भात चर्चा झाली का? मनोमिलन होणार का? असे प्रश्‍न विचारले असता उमेदवारी संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच दोन राजांच्या मनोमिलनावर भाष्य करण्यास आ. शिंदे यांनी नकार दिला.

यानंतर ना. रामराजे यांना मुंबईतील बैठकीसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी पवारसाहेबांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. मराठा मोर्चा निघाले असताना सांगली महानगर पालिकेत त्याचा काही फायदा झाला नाही. 

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंबरोबरच्या वादाबाबत निर्णय घ्यावा. पण मी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या सोबत त्यावेळीही होतो आणि यापुढेही राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बँकेचे संचालक दादाराजे खर्डेकर, विक्रमसिंह पाटणकर, नितीन पाटील, संचालिका कांचन साळुंखे उपस्थित होते.