कराड : प्रतिनिधी
माझे तुमच्यावरच जास्त प्रेम आहे, अशी ग्वाही डॉ. अतुल भोसले यांना देत तुम्ही सर्व एकत्र रहा. मी तुमच्या कुटुंबांतील प्रेमही पाहिले आहे आणि मतभेदही पाहिले आहेत. राजकारणात मी 40 वर्ष कार्यरत आहे. त्यामुळे जपून पावले उचला, असा सल्ला आ. डॉ. पतंगराव कदम यांनी विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना दिला आहे.
स्व. जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आ. कदम यांच्या भाषणापूर्वी बोलताना डॉ. अतुल भोसले यांनी डॉ. कदम यांचे आमच्या कुटुंबांवर प्रेम आहे. त्याचबरोबर सर्वात जास्त त्यांचे प्रेम डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यावरही असल्याचे यावेळी त्यांनी नम्रपणे नमूद केले.
त्यानंतर माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी डॉ. अतुल भोसले यांच्या वक्तव्याचा धागा पकडत मोहिते - भोसले कुटूंब एकत्र राहिले पाहिजे, अशी आपली प्रामाणिक इच्छा आहे. चाळीस वर्षापूर्वी स्व. यशवंतराव मोहिते, स्व. जयवंतराव भोसले यांनी दबदबा निर्माण केला होता. मात्र मतभेदांमुळे हा दबदबा नाहिसा झाला होता. आता पुन्हा दबदबा निर्माण करण्यासाठी इंद्रजित मोहिते यांच्यासह सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे.
जिल्ह्याच्या राजकारणातील परिस्थितीमुळे डॉ. अतुल भोसले यांनी वेगळा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य की अयोग्य ? याचे उत्तर येणारा काळच देईल. 2010 साली इंद्रजित मोहिते, मदनराव मोहिते, सुरेश भोसले, अतुल भोसले माझ्याकडे आले होते. मात्र कारखाना निवडणुकीत भोसले समर्थकांनी अर्ज माघारी घेतले. पुढे कोणी काय केले? याच्या खोलात आपण जाणार नाही. मात्र मी राज्याचा सहकारमंत्री म्हणून काम केले आहे. चुकीची माणसे सत्तेवर गेल्यावर एखाद्या संस्थेचे कसे वाटोळे होते? हे मला माहिती आहे, असे सांगत नामोल्लेख टाळत आ. कदम यांनी अविनाश मोहिते यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टिकाही यावेळी केली.
तर मदनराव मोहिते म्हणाले, जयवंतराव भोसले यांचे काम मोठे आहे. चांगल्या कामाला विरोध करायचा नाही, हे आपले तत्व आहे. म्हणूनच मी अतुल भोसले यांना ताकद देत असल्याचे मदनराव मोहिते यांनी यावेळी सांगितले. यावेळी पृथ्वीराज भोसले, उत्तरा भोसले, गौरवी भोसले, विनायक भोसले, सिद्धार्थ घाटगे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाचा प्रारंभ व शेवट झाला.