होमपेज › Satara › ग्रामपंचायत कारभारात पतींचाच हस्तक्षेप

ग्रामपंचायत कारभारात पतींचाच हस्तक्षेप

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 8:45PMपिंपोडे बुद्रुक : कमलाकर खराडे 

स्थानिक स्तरावर राजकारणात महिला सक्रिय झाल्याचा आभास निर्माण केला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून राजकारणात महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र महिला निवडून आल्यावर ग्रामपंचायत कारभारात त्यांचे पतीच लक्ष घालत असल्याने या आरक्षणाचा हेतू सफल झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत नाही.अलीकडच्या काळात ग्रामीण भागही राजकीयदृष्टया संवेदनशील झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर अनेक गावांत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागत असतो. निवडणुकीदरम्यान होणारे वाद गंभीर वळणावर जात आहेत. यातूनही वेळीच बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.दरम्यान निवडून आलेल्या महिलांचे पतीच स्थानिक राजकारणात उचापती करताना दिसत आहेत.

आज महिला सर्वच आघाड्यांवर चमकदार कामगिरी करीत आहेत. अतिशय कुशलपणे प्रशासन हाताळण्यापासून  समाजाच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देताना दिसतात. त्यांच्या कर्तृत्वाला अधिक झळाळी मिळावी, विकास प्रक्रियेत त्यांचा वाटा असावा, या उद्देशाने गेल्या काही वर्षात राजकारणात महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे. स्वकर्तृत्व आणि प्रशासनावर मजबूत पकड असणार्‍या अनेक महिला आज राजकारणात सक्रिय आहेत. माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, विद्यमान केंद्रीय विदेश मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या व अशा अनेक महिलांनी आपले कर्तृत्व वेळोवळी सिद्ध केले आहे. हाच वारसा पुढे चालू रहायला हवा.

स्थानिक  पातळीवर मात्र महिलांच्या सक्रिय राजकारणाबाबत नकारात्मकता दिसून येते. केवळ नावापुरती महिला अन कारभार मात्र पतीराजांचा अशीच अवस्था आहे. कोणत्याच प्रक्रियेत त्यांना सामावून घेतले जात नाही. फक्त सहीच्या धनी त्या झाल्या आहेत.त्यातच प्रशासकीय अधिकार्‍यांनी पतीराजांच्या हस्तक्षेपास विरोध केला तर मात्र वादविवाद होतात. राज्याच्या ग्रामविकास खात्याने याबाबत कडक धोरण अवलंबून सर्वच ग्रामपंचायतिच्या ग्रामविकास अधिकार्‍यांना सूचना देऊन मासिक बैठकीला संबंधित महिला सदस्यांना  उपस्थित राहण्याबाबत सुचवून त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्यायला हवे. तरच महिला सक्षमीकरणाचा उद्देश सफल होऊ शकतो.

पतीराजांना बैठकीतून जाण्यास सांगितले

उत्तर कोरेगाव तालुक्यातील एका गावात नुकतीच ग्रामपंचायतीच्या सदस्यांची  मासिक बैठक झाली. त्या बैठकीत सरपंचांनी महिला सदस्यांच्या पतींना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले त्यावरून बरेच रामायण-महाभारत झाले. काही सदस्यांनी सरपंचांना खाजगीत बरेच काही सुनावल्याची चर्चा गावात दबक्या आवाजात सुरू आहे. एकूणच आरक्षणाचा लाभ उठवून आपली राजकीय वाटचाल अबाधित ठेवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न दिसतो. मात्र त्यामुळे एकूण विकास प्रक्रियेत महिलांचा सहभाग राहू शकणार नाही. हे सुद्धा स्पष्ट आहे.