Wed, Mar 20, 2019 03:02होमपेज › Satara › रणरणणारा सूर्य आग ओकत आहे..!

रणरणणारा सूर्य आग ओकत आहे..!

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 8:29PMसातारा : सुनील क्षीरसागर 

वर्षामध्ये मार्च आणि ऑक्टोबर हे महिने प्रचंड तापमानाचे महिने म्हणून ओळखले जात असून सध्या तापमानाने अत्युच्च पातळी गाठायला सुरुवात केली आहे. बंद ढगाआडून सूर्याच्या आग ओकणार्‍या किरणांमुळे अवघ्या धरित्रीची लाहीलाही होत आहे. 

यावर्षी मार्च महिन्यामध्येच कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. रात्रीच्यावेळी पडणारी कडाक्याची थंडी आता संपली असली तरी दिवसाच्या  प्रखर उष्णतेमुळे पशुपक्षी, प्राणीमात्रांचे जीवनमान कठीण बनले आहे. निरभ्र निळ्या आकाशातून सूर्य आग ओकत असतानाच डोंगर पठारावर वणवे लागत आहेत. या वणव्यातून डोंगर पठार आणि टेकड्याही रूक्ष बनल्या आहेत. लालभडक वणव्यातून असंख्य जीवांची राख होतेय. फडफडणारी पाखरेही आकांताने उडताहेत. हिरवे लुसलुसीत गवत त्याच्या फटकार्‍याने काळवंडून जात आहे. मानवाच्या विनाशकारी बुद्धीने सूर्य मात्र आग ओकत आहे. 

सह्याद्रीचे गडकोट अवघ्या महाराष्ट्रभर पसरले असून रणरणत्या उन्हात वृक्षवेलींनी बहरलेले हे गडकोट आता उन्हाळ्याच्या तोंडावर रूक्ष बनले आहेत. आग ओकणार्‍या सूर्यामुळे डोंगरकड्यावरील गवत वाळले असून  खुरटी पर्णहिन झुडपे हे द‍ृष्य आणखी रूक्ष बनवत आहेत. 

ग्रामिण आणि  दुष्काळी भागातील रुक्ष माळराने वाळल्या गवताने आणखी शुष्क बनली असून खुरट्या आणि वाळक्या झुडूपाखाली थांबलेले जनावर हिरव्या ओअ‍ॅसिसचे मृगजळ पहात उभे आहे. साखरेच्या गोड पट्टयात उसाच्या तापल्या शेतालाही सूर्य भाजून काढत असून या तापल्या तिवईवरच उद्याच्या भविष्याची स्वप्ने पहात तोडकर्‍यांचा कोयता ऊसाची साखर चिरत आहे. सूर्याच्या प्रचंड काहिलीने मरगळलेली-घामेजलेली शरिरे नदी आणि विहिरींच्या पाण्यात सूर मारण्यासाठी आसुसली असतानाच आता वाळूची विवरे पोटात घेवून नद्याच भक्ष्य बनल्या आहेत.

असेच डोंगर माथ्यावर रणरणते ऊन पोटात घेऊन सूर्य आग ओकत असतानाचे छायाचित्र टिपले आहे साई सावंत यांनी..!