Fri, Apr 26, 2019 03:57होमपेज › Satara › टपर्‍यांतून मिळताहेत गुंडांच्या टोळ्यांना हप्‍ते

टपर्‍यांतून मिळताहेत गुंडांच्या टोळ्यांना हप्‍ते

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 12 2018 10:52PMसातारा : विठ्ठल हेंद्रे 

सातार्‍यातील मच्छी मार्केट, पोवई नाका, स्टँड परिसर, बाँबे  रेस्टॉरंट व राजवाडा परिसरात भानगडबाज टपर्‍यांचे सर्वाधिक पेव फुटलेले आहेे. टपर्‍यांच्या माध्यमातून सातार्‍यात दर महिन्याला लाखो रुपयांची छापाछापी करणारी टोळी सक्रीय असून वर्चस्वासाठी यातून टोळ्याच्या टोळ्या उभारल्या जात आहेत. या टोळ्या पालिका व पोलिस प्रशासनाचे हात ‘ओले’ करत असल्याने त्यांना अभय मिळत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, वेळीच टपर्‍यांची अतिक्रमणे हटली नाहीत तर भविष्यात वर्चस्व वादातून एखाद्याचा बळी जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सातारा शहरात प्रामुख्याने खालचा, वरचा रस्ता, राधिका रोड व बोगदा असे एकूण चार रस्ते आहेत. यातील खालचा रस्ता, स्टँड परिसर, राजवाडा परिसर व बाँबे रेस्टॉरंट हा प्रमुख बाजार पेठांचा परिसर म्हणून ओळखला जातो. सातारची भौगोलिक रचना मर्यादित असल्याने या परिसरात दिवसेंदिवस बाजारपेठांसाठी व्यवसायिकांची खचाखच गर्दी होत आहे. सुसुत्रता व आराखडा नसल्याने या बाजार पेठात अनेक टपर्‍या चालकांची अक्षरश: चांदी होत आहे. हप्‍तेखोरीच्या माध्यमातून कुणीही येरागबाळा येतो व बिनधास्तपणे टपरी टाकून व्यवसायाला सुरुवात करतो. व्यवसाय करण्याबद्दल कोणाचा आक्षेप नाही पण व्यवसाय परवाना, नगर पालिका प्रशासनाची परवानगी या व अशा नियमांच्या चाकोरीतच तो होणे गरजेचे आहे.

अनधिकृत टपर्‍यांबाबत प्रशासनाचा गांधारी कारभार सुरु असल्याने स्थानिक गुंडा-पुंडानी धुमाकूळ घातला आहे. एखाद्या व्यवसायिकाला व्यवसाय करण्यासाठी प्रशासकियपेक्षा दादा लोकांची ‘एनओसी’ मिळवण्याचे सातार्‍यात ‘फॅड’ सुरु असल्याचे वास्तव आहे. यासाठी शहरात त्या त्या परिसरामध्ये टोळ्या तयार झालेल्या आहेत. या टोळक्यांचा ‘म्होरक्या’ टपर्‍या टाकून देण्यासाठी सावज शोधत असून ‘पंटर’ लोक अशा ‘क्‍लायंटला’ टपरी टाकून दिल्यानंतर दुसर्‍या कोणाचा त्रास होणार नाही अशी व्यवस्था केली जाते.  पोवई नाका, स्टँड परिसर, मच्छी मार्केट, राजवाडा, बॉम्बे रेस्टॉरंट परिसर येथे अशा टोळ्या पूर्णवेळ कार्यरत आहेत. धक्‍कादायक बाब म्हणजे टपर्‍या उभ्या करण्यापासून ते त्यांना संरक्षण देण्यापर्यंत मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. एक टपरी उभी करण्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंतचा ‘चार्ज’ आकारला जात आहे. त्यानंतर त्या टपर्‍यांना संरक्षण देण्यासाठी प्रतिमहिना 10 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंतचा हप्‍ता घेतला जात असल्याची खुलेआम चर्चा या व्यवसायिकांमधून सुरू असते. 

स्थानिक पोलिस व नगर पालिकेतील भरारी पथकही यामध्ये आपले ‘हात ओले’ करुन घेत असल्याचे आरोप होत आहेत. वेळ मिळाला की भिरकीट करत जायचे टपर्‍या चालकांना दम भरायचा तो टपरी चालक कावराबावरा झाला व दयेची मागणी करु लागला की मग 1 हजार रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यंतची तोड करायचा, असा ‘उद्योग’ केला जात आहे. यातून ‘सेटलमेंट’ झाली तर ठीक नाही तर मग ‘फाळकूट दादा’ मध्यस्थी करुन पालिका व पोलिसांना ‘मॅनेज’ करत आहेत. या सर्व प्रकारात एका एका टपरी चालकांकडून दर महिन्याला गुंड, नगर पालिका व पोलिस यांच्यासाठी 25 ते 30 हजार रुपयांसाठी हप्‍ता जात असल्याने याची उलाढाल लाखो रुपयांमध्ये होत असल्याची चर्चा आहे.

बेकायदेशीर टपर्‍या चालकांना गुंडांची व पोलिसांची तर कायदेशीर टपर्‍या चालकांना नगरपालिकेची नेहमीच भिती वाटत आली आहे. टपरी चालक हा सर्वसामान्य कष्टकरी वर्गातीलच आहे. हातावरचे पोट भरण्यासाठी कायदेशीर जागा नसल्याने व प्रक्रियेचा गुंता असल्याने तो फाळकुट दादांना शरण जात आहे. अतिक्रमण, टपर्‍या हा सर्वस्वी विषय नगरपालिकेच्या अखत्यारीत असतानाही ही यंत्रणा अर्थपूर्ण कारणांसाठी दुर्लक्ष करते. वर्षातून दोन ते तीनवेळा अतिक्रमण मोहीम राबवण्याचा ‘इव्हेंट’ करुन पालिका व पोलिस एकत्र येतात. सर्व लवाजमा रस्त्यावरही उतरतो मात्र वर्षानुवर्ष व बड्यांचे असणार्‍या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करुन थातूरमातूर कारवाई करुन पाट थोपटण्याचा प्रकार होतो. वर्षातून चार दिवस अतिक्रमण या विषयावरुन रणकंदन होते वास्तविक मात्र गोरगरिबांच्या टपर्‍या उचलल्या जातात व कारवाई गुंडाळली जाते.