Sat, Aug 24, 2019 21:22होमपेज › Satara › तडीपार गुंडाचा खून

तडीपार गुंडाचा खून

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 10:41PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील अर्क शाळा परिसरात गुरुवारी सकाळी तडीपारीत असलेला गुंड कैलास नथू गायकवाड (वय 25, रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा) याचा निर्घृण खून झाल्याने परिसर हादरून गेला आहे. कैलासच्या तोंडावर फरशीच्या तुकड्याने वार झाले असल्याचे दिसत असून सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदनाचे काम सुरू होते. कैलासच्या वडिलांनी तक्रार दिली असून एकावर संशय व्यक्‍त केला आहे. दरम्यान, खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कैलास शंकर पिटेकर असे संशय व्यक्‍त केलेल्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कैलासचे वडील नथू मारुती गायकवाड (रा.नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबातब अधिक माहिती अशी, शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अर्कशाळा हा वर्दळीचा परिसर आहे. गुरुवारी सकाळी काही नागरिकांना एका युवकाचा मृतदेह पडलेला दिसला. या घटनेची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्यानंतर पाहता पाहता परिसरात गर्दी उसळली. शाहूपुरी पोलिसांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत तो मृतदेह कैलास गायकवाड या युवकाचा असल्याचे समोर आले. कैलासला सध्या पोलिस दलाने तडीपार केलेले आहे. गुंडांचा निर्घृण खून झाल्याचे समोर आल्यानंतर परिसर हादरून गेला.कैलास गायकवाड याच्या कुटुंबीयांनीही याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कैलासचा निपचित पडलेला मृतदेह पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला. पाहता पाहता या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पावसाची रिपरिप असतानाही परिसरात गर्दी वाढू लागल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गायकवाड कुटुंबियांची समजूत काढून पंचनामा करण्यास सुरुवात केली.

कैलासचे वडील नथू गायकवाड यांच्याकडे पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केली. घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी गायकवाड कुटुंबियांची समजूत काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेला. जो पर्यंत मारेकर्‍यांना पोलिस पकडत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पुन्हा पवित्रा घेतल्याने रुग्णालय परिसरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी कैलासच्या वडिलांना तक्रार देण्यास सांगितल्यानंतर त्यांनी तक्रार दिली.

नथू गायकवाड यांनी तक्रारीत म्हटले आहे की, फेब्रुवारी 2018 मध्ये सोनगाव, ता.सातारा येथे गायकवाड यांच्या नात्यातील एक विवाह होता. त्यावेळी कैलास गायकवाड हा त्यांचा मुलगाही लग्‍नामध्ये आला होता. मात्र, त्यावेळी कैलास पिटेकर याच्यासोबात कैलास गायकवाडचा वाद झाला होता. या घटनेत कैलास गायकवाडला मारहाण झाल्याने त्याबाबत पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल करयात आली. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने पिटेकर चिडून होता. बुधवारी दुपारी मुलगा कैलास गायकवाड व संशयित पिटेकर या दोघांना जुना मोटार स्टँड येथे पाहिले. रात्री मुलगा कैलास गायकवाड घरी जेवला व बाहेर जातो असे सांगून गेला तो आलाच नाही. यामुळे कैलास पिटेकर यानेच मुलाचा जुन्या वादाच्या कारणातून खून केला असावा, असा तक्रारीत संशय व्यक्‍त कण्यात आला आहे.

दरम्यान, तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक माहिती घेवून संशयिताच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना केली. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर अखेर सायंकाळी गायकवाड कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला.

फरशी, दारूची बाटली व रक्‍ताचा थारोळा..

घटनास्थळी कैलास गायकवाड याच्या चेहर्‍यावर वर्मी घाव होते व त्याला लागूनच फरशीचे तुकडे पडलेले होते. या हल्ल्यात मृतदेह रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तसेच त्याच्या बाजूलाच दारूची एक बाटलीही पडलेली होती. फरशीच्या तुकड्याने त्याच्यावर हल्‍ला करून त्याचा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. दरम्यान, पोलिसांचा पंचनामा सुरू असताना जमावाने ‘मारेकर्‍यांना तत्काळ पकडा, मगच मृतदेह घटनास्थळावरून उचला’ असा पवित्रा घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.