Thu, Jun 27, 2019 13:40होमपेज › Satara › लाईट चमकली अन् दत्ताची दहशतच मोडीत निघाली

लाईट चमकली अन् दत्ताची दहशतच मोडीत निघाली

Published On: May 06 2018 1:11AM | Last Updated: May 05 2018 11:22PMसातारा : विठ्ठल हेंद्रे

प्रतापसिंहनगर म्हणजे कुख्यात गुंड दत्ता जाधवची ‘दगडी चाळच’.  पोलिसांनाही ललकारणार्‍या याच दगडी चाळीत शुक्रवारी पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईकची मोहीम फत्ते केली.   कारवाईसाठी आलेल्या पोलिसावर महिला पुढे करुन चाल करणे ही त्याची जुनी खोडच. मात्र, शुक्रवारी पोलिस या सगळ्याला पुरुन उरले. एकदा डोकावून गेलेल्या कुलूप बंद खोलीत लाईट चमकल्याचे दिसताच पोलिसांची शंका बळावली अन् दत्ता जाधव अलगद जाळ्यात सापडला. त्यानंतर त्याची ‘वरात’ काढत उरली सुरली दहशतही पोलिसांनी मोडीत काढली.

कुख्यात गुंड दत्ता जाधवच्या कारनाम्यांनी प्रतापसिंह नगरासह परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. त्याच्यावर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत होती. जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी मात्र ही दहशत मोडीत काढण्याचे मोठे काम केले. शुक्रवार हा सातारा पोलिस दलातील एक महत्वाचा दिवस मानला गेला. गुंड दत्ता जाधव याच्यावर मोक्‍कासारखा गंभीर गुन्हा दाखल असतानाही तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्यातच जत तालुक्यातील प्रतापपूर येथे पोलिसांवरच हल्‍ला करुन तो पसार झाला होता.

त्यामुळे  दत्ताला जेरबंद करणे पोलिसांसमोर आव्हान बनले होते. शुक्रवारी दुपारी दत्ता जाधव हा प्रतापसिंहनगरमध्येच असल्याची पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाईचा प्लॅन पोलिसांनी आखला होता. यापूर्वी ज्या ज्या वेळी प्रतापसिंहनगरात कारवाईची मोहीम उघडली त्या त्या वेळी महिलांचा जमाव पुढे करुन गोंधळ घालत कारवाई हाणून पाडण्याचे षड्यंत्र रचले गेले होते. त्यामुळे शुक्रवारी मात्र पोलिसांनी या सर्व बाबी हेरुन फलटण, वाठार स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिस वेगवेगळ्या वेशात सतर्क झाले होते.

या तिन्ही पथकातील पोलिस सुरुवातीला 4 वाजता प्रतापसिंहनगरात घुसले. दत्ता जाधव रहात असलेल्या घराला पोलिसांनी वेढा देवून सर्वत्र पाहणी केली. सुमारे दीड तास परिसरात सर्च करुनही पोलिसांना दत्ता सापडला नाही.या मोहिमेदरम्यान एक घर बंद दिसले. पोलिसांनी त्याबाबत विचारणा केल्यानंतर त्या घरातील कुटुंबिय परगावी कुलूप लावून गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, तरीही  पोलिसांनी मोबाईलच्या बॅटरीद्वारे खिडकीतून त्या घराची पाहणी करण्याचाही प्रयत्न केला.

सहा वाजण्याच्या सुमारास सुमारे 50 पोलिसांपैकी 40 पोलिस प्रतापसिंहनगरातून बाहेर पडले. 10 पोलिस मात्र साध्या वेशात त्याच ठिकाणी सोंग घेवून थांबून होते. संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुन्हा बाँबे रेस्टॉरंट येथून पोलिसांचा फौजफाटा प्रतापसिंहनगरात घुसला. पोलिस आल्यानंतर पुन्हा कोंम्बिग ऑपरेशन राबवत असतानाच जे घर बंद होते व त्यामध्ये सुरुवातीला लाईट नसताना दुसर्‍या वेळेला मात्र लाईट दिसल्याने पोलिसांची शंका बळावली. त्यामुळे पोलिसांनी त्या घराला वेढा मारला व कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. पोलिस प्रतापसिंहनगरमध्ये तळ ठोकून असल्याने दत्ता जाधव याला बाहेरुन कुलूप लावलेल्या घराचा आसरा घ्यावा लागला होता. दुपारपासून तो त्याच घरामध्ये बसून होता. प्रचंड उन्हामुळे आत बसून त्याचीही लाही लाही झाली होती. दिवसभर लाईट बंद ठेवल्याने व एकदा पोलिसांनी चेक केल्याने परत पोलिस येणार नाहीत असा अंदाज दत्ता जाधव याचा होता. यामुळेच त्याने लाईट लावून पंखा लावला होता. मात्र, चाणाक्ष पोलिसांनी त्याची डाळ शिजू दिली नाही.

दत्ता जाधव याला घरातून बाहेर काढल्यानंतर नेहमीप्रमाणे बाहेर दंगा होईल अशी त्याला अपेक्षा होती. मात्र, पोलिसांनी मायक्रोप्लॅनिंग केल्याने तसा प्रयत्न फसला. महिला पोलिस उपअधीक्षक नंदा पाराजे यांनी महिला पोलिसांसह परिसरातील महिलांवर ‘वॉच’ ठेवला होता. महिला पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचे ते चक्र भेदण्याचे यावेळेस कोणाचेही धाडस झाले नाही. पोलिसांनी दत्ता जाधव याला बाहेर काढून तत्काळ पोलिस व्हॅनमध्ये बसवले. मात्र, पोलिसांची ही व्हॅन बंद पडल्याने त्याला चालवत रस्त्यावर आणले. अन् तेथूनच त्याची ‘वरात’ पोलिस ठाण्यात नेली. पोलिसांच्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे दत्ताची दशहत मात्र मोडीत निघाली.

कारवाईतील धडाकेबाज पोलिस...

गुंड दत्ता जाधव याला जेरबंद करण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोबेशनरी पवन बनसोड, प्रोबेशनरी डीवायएसपी नंदा पाराजे, पोनि पद्माकर घनवट, पोनि नारायण सारंगकर, सपोनि विकास जाधव, सपोनि मयुर वैरागकर, फौजदार सागर गवसणे, शशि मुसळे, पोलिस हवालदार सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे, शरद बेबले, रामा गुरव, विजय शिर्के, तानाजी माने, विजय कांबळे, विक्रम पिसाळ, प्रवीण फडतरे, अतुल कुंभार, सुर्यकांत जाधव, ज्ञानदेव चोरट, मोहन भोसले, सहदेव तुपे, अभिजीत काशीद, सचिन जगताप, अवधूत धुमाळ यांनी सहभाग घेतला होता.

दत्ताला आजवर मदत करणारे शोधून सस्पेंड करा

गुंड दत्ता जाधव याचा पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांसोबत संपर्क असल्याचे सर्वश्रृत आहे. यामुळे दत्ता जाधव याला पोलिस उचलणार असल्याची माहिती खबर्‍यामार्फत त्याला मिळत होती. आजही त्याबाबत पोलिस दलातच उलटसुलट चर्चा सुरु आहे. शुक्रवारी कारवाई करताना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी या कारवाईसाठी फलटण, वाठार स्टेशन व एलसीबीचे पोलिस तैनात केले होते. या पोलिसांच्या दुपारी 1 वाजल्यापासूनच हालचाली सुरु होत्या. मात्र, त्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. सातारा शहर पोलिसही त्याबाबत अनभिज्ञ होते. दरम्यान, पोलिस अधीक्षकांनी दत्ता जाधव याच्या संपर्कात असणार्‍या पोलिसांनाही ‘सुट्टी’ देवू नये. पोलिस दलाशी बेईमानी करणार्‍यांची पोलखोल करुन त्यांना सस्पेंड करणार का? याकडेही आता लक्ष लागले आहे.