Sat, Apr 20, 2019 10:00होमपेज › Satara › शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा रविवारी सन्मान : कर्नल जाधव

शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा रविवारी सन्मान : कर्नल जाधव

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 11:12PMसातारा : प्रतिनिधी

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणार्‍या सातारा जिल्ह्याने त्यानंतरही देशसेवेची परंपरा अखंड ठेवली आहे. देशाच्या सीमेवर शौर्य गाजवून शहीद होणार्‍या जवानांच्या कुटुंबीयांचे आत्मबळ वाढावे यासाठी दि. 28 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत सातारा सैनिक स्कूलच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये सकाळी 10.30 वाजता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (नि) राजेंद्र जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कर्नल  राजेंद्र जाधव म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जिल्ह्यातील 252 सैनिक सीमेवर शहीद झाले. त्यामध्ये सातारा, कोरेगाव, खटाव या तालुक्यातील शहीद सैनिकांची संख्या मोठी आहे. सीमेवर जवान धारातीर्थी पडल्यावर त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचे आभाळ कोसळते. त्यांना या परिस्थितीतून सावरण्याचा प्रयत्न  करण्याच्या हेतूने तसेच त्यांना आत्मबळ मिळावे यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय तसेच आम्ही सातारकर या संघटनेच्या माध्यमातून शहिद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार असून मान्यवरांच्या हस्ते शहिद जवान कुटुंबीयांचा  शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात येणार आहे.  कार्यालयाकडून शहिद जवान कुटुंबीय तसेच माजी सैनिकांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहे. शहिदांच्या पत्नींचा पुनर्विवाह व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही कर्नल जाधव यांनी सांगितले. यावेळी सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुनील नेवसे, अतुल काटकर उपस्थित होते.