Sun, Jul 21, 2019 01:49होमपेज › Satara › कोयना विनाशकारी महाभूकंपाची ५० वर्षे

कोयना विनाशकारी महाभूकंपाची ५० वर्षे

Published On: Dec 11 2017 12:38PM | Last Updated: Dec 11 2017 12:38PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शेकडो निष्पापांचा बळी घेऊन हजारो नव्हे तर लाखो कुटुंबांच्या संसारांची राखरांगोळी करणारा विनाशकारी महाभूकंप 11 डिसेंबर 1967 साली झाला. या भूकंपाला आज 50 वर्षे पूर्ण झाली. उषःकाल होता होता काळरात्र झाली याचप्रमाणे कोयना व सर्वच उद्ध्वस्त झाले, बेचिराख झाले, होत्याचे क्षणार्धात नव्हते झाले. त्या काळ्या आठवणी आजही तितक्याच तीव्रतेने जाणवतात. त्यानंतर मात्र खरोखरच याच भूकंपग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नव्याने मशाली पेटल्या का? याचे मात्र समाधानकारक उत्तर मिळत नाही हीच खरी शोकांतिका...

‘मेणबत्त्या पेटवून मृत भूकंपग्रस्तांना श्रद्धांजली वाहिली, त्या पेटविण्यापुरतीच आता आमची कर्तव्य राहिली’ या चारोळ्यांप्रमाणचं इथल्या भूकंपपीडित जनतेच जिणं. 11 डिसेंबर 1967 रोजी पहाटे 4.21 वाजता हा विनाशकारी 6.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. गाढ साखरझोपेत असणार्‍या अबालवृद्धांसह सर्वांवरच काळाने हा हल्ला केला. डोळे उघडण्याची संधीही शेकडोंच्या नशिबी आली नाही. हजारो अपंग झाले तर लाखो बेघर झाले. सूर्योदयानंतर डोळ्यासमोर आपल्याच माणसांच्या मृतदेहांचे ढीगच्या ढीग आणि काडी काडी गोळा करून उभा केलेला संसार पत्त्यांच्या इमारतीसारखा कोसळला होता. याच ढिगार्‍यातून आधी कोणाला बाहेर काढू? कोण जगलंय आणि कोण मेलंय? याचा ताळेबंद कसा लावू? याच ढिगार्‍यात मला जन्म देणारी आईही आहे आणि ज्यानं स्वतः जगण्यापेक्षा मला जगविण्यासाठी आयुष्य वेचले तो बापही. जिला सात फेर्‍यांच्या साक्षीने घरी आणलं आणि आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं ती बायकोही आहे आणि ज्यांच्या डोळ्यात उद्याच भविष्य पाहिलं होतं ती लेकरंपण याच ढिगार्‍याखाली होती. कोणाच्या अखेरच्या घटका संपल्या होत्या, तर जीवाच्या आकांताने कोणाची तरी जगण्यासाठी आणि जगविण्यासाठी अखेरची केविलवाणी धडपड सुरू होती. हंबरडा फोडावा, कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवावं असं कोणीच जवळ नव्हतं. आता उजाडलं होतं समोर डोळे दिपवणारा लख्ख प्रकाशही होता, मात्र काळानं घातलेली अंधारी काय केल्या डोळ्यासमोरून जात नव्हती. यातून मग
आपल्या रक्‍तामांसाची जीव गेलेली शरीरं बाहेर काढल्याशिवाय पर्यायच नव्हता. आजकाल जेसीबी, पोकलँड सारखी अत्याधुनिक मशिनरी भावनाशून्य असे ढिगारे माळीणसारख्या दुर्घटनेत उपसताना पाहिली. मात्र, त्यावेळी अशी मशिनरी नव्हती त्यामुळे आपलाच उद्ध्वस्त संसाराचा ढीग उपसताना त्यातूनच हे मृतदेह बाहेर काढताना कोणीतरी जिवंत असेल असा खोटा मात्र तितकाच आशावाद ठेवणारा
‘यंत्र’ माणूस त्याची केवळ अधिकृतरीत्या जिवंत असण्याची ती कर्तव्यभावना आजही अंगावर काटा व डोळ्यात पाणी आणल्याशिवाय शांत बसत नाहीत. या भूकंपात सगळं काही संपलं होतं. ‘पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे. कोणी रडणारचं नसेल तर मरणंसुद्धा व्यर्थ आहे.’ अशीच अनेकांची अवस्था झाली होती. त्यानंतर याबाबत तत्काळ तात्पुरत्या उपाययोजना झाल्या. मात्र, आज पन्‍नास वर्षे पूर्ण होऊनही किमान जगण्याचा व त्यासाठी लागणार्‍या नागरी सुविधा पुरविण्यात शासन सपशेल अपयशी ठरले आहे. पुनर्वसन, भूकंपग्रस्तांना नोकरी अथवा शिक्षणासाठी लागणारे दाखले व नोकर्‍या आदींबाबत आजवर या पीडितांना किंवा त्यांच्या पिढ्यांनाही न्याय मिळाला नाही. आता या पन्‍नास वर्षपूर्तीनिमित्त शासनाला यांच्या मागण्यांसाठी जाग यावी म्हणून येथे आज मेणबत्त्या पेटवून कँडल मार्च काढून भूकंपात जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. एक सोपस्कार म्हणून हे ठीक असले तरी जर पन्‍नास वर्षे अनेक आंदोलने करूनही संबंधितांना न्याय मिळत नसेल तर मग ‘तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर मग तोंडात वाजवून न्याय मिळवा.’ याप्रमाणेच न्याय मिळवावा लागणार आहे. मेणबत्त्यांच्या मिणमिणत्या प्रकाशाने राज्यकर्त्यांच्या डोक्यात म्हणावासा प्रकाश पडणार नसेल तर मग येथे आंदोलनाच्या मशाली पेटविल्याशिवाय न्यायच मिळणार नाही आणि तीच खरी या भूकंपात निष्पाप जीव गेलेल्या भूकंपग्रस्तांना श्रद्धांजली ठरेल.

1967 च्या भूकंपबळींना, आता म्हणे 50 वर्षे झाली. म्हणूनच का सगळ्यांना पुन्हा, त्यांची आठवण झाली? तुच्याच वीज, पाण्यासाठी, त्यांनीच जमिनी दिल्या होत्या. जमिनीच न्हवे तर भूकंपात, त्यांच्याच पिढ्या गाडल्या होत्या. जमिनीपेक्षाही खोल भेगा, यांच्या नशिबालाच पडल्यात. पुनर्वसन, दाखले, नोकर्‍या, लालफितीतच दडल्यात. नकोत आता घोषणा आणि तीच ती आश्‍वासनं. मेणबत्त्या पेटवून कधी, जागं होत का हो शासन? भीक नको न्यायासाठी, आता तरी ’मशाली’ पेटवा. श्रद्धांजली म्हणून का होईना यांचे , कायमचे ’दारिद्र्य’ मिटवा. - गणेशचंद्र पिसाळ(रा. पाटण) 

Image may contain: ocean, sky, outdoor, water and nature

Image may contain: outdoor

Image may contain: outdoor