होमपेज › Satara › ऐतिहासिक वारसा लाभलेले पंचगंगा मंदिर

ऐतिहासिक वारसा लाभलेले पंचगंगा मंदिर

Published On: Aug 20 2018 12:04AM | Last Updated: Aug 19 2018 10:56PMमहाबळेश्‍वर म्हणजे भूतलावरील स्वर्गच जणू. महाराष्ट्राचे नंदनवन व निसर्गाने परिपूर्ण भरलेलं आणि सह्याद्रीच्या उतुंग गिरिशिखरावर वसलेलं एक जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून महाबळेश्‍वर ला ओळखले जाते. याबरोबरच महाबळेश्‍वरची एक पवित्र तीर्थक्षेत्र व धार्मिक स्थळ म्हणून देखील पूर्वी पासून ओळख आहे. महाबळेश्‍वर पासून 6 किमी अंतरावर अद्वितीय निसर्गसौंदर्याचे देणे लाभलेला परिसर म्हणजे श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथे ऐतिहासिक वारसा लाभलेले पंचगंगा मंदिर आहे. या मंदिरात श्रावणी सोमवारी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. 

श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथे असलेल्या पंचगंगा मंदिरालाही ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. सुमारे 600 वर्षापूर्वीचे असलेले हे मंदिर पाच नद्यांचे उगमस्थान असून या मंदिरातून कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री व वेण्णा या नद्यांचा उगम झाला आहे. पुरातन कथेनुसार ब्रह्मा, विष्णू, महेश, सावित्री व गायत्री या देवतांचा येथून जलरुपात उगम झाला असल्याचेे म्हटले जाते. श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीस लाखो भाविक क्षेत्र महाबळेश्‍वरला भेट देतात. 

सर्वांच्या मनोकामना, इच्छा पूर्ण होतात म्हणून आद्य शंकराचार्यांनी पाचही नद्या व श्री महाबळेश्‍वर यांच्याकडे खालील प्रार्थना केली.कृष्णा ईच्छित फल प्राप्त करो, वेण्णा आमच्या शत्रूंचा नाश करो व कोयना सुखकारक शंभर पुत्र  देवो, सावित्री संपत्ती प्राप्त करून देवो व गायत्री ज्ञान प्राप्त करून देवो. त्याच प्रमाणे श्री महाबळेश्‍वर देव आमचे नेहमी रक्षण करो.