Fri, May 24, 2019 09:22होमपेज › Satara › हिंदुत्ववादी संघटना पुन्हा एकदा रडारवर

हिंदुत्ववादी संघटना पुन्हा एकदा रडारवर

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 11 2018 10:32PMसातारा : प्रतिनिधी

मुंबईतील नालासोपारा या भागामध्ये एटीएस पथकाने कारवाई करून मोठा दहशतवादी कट उधळून लावला. याप्रकरणी सुमारे 12 जणांना अटक करण्यात आली असून सुधन्वा गोंधळेकर या सातार्‍यातील संशयितालाही जेरबंद केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गोंधळेकर हा शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता आहे. या प्रकरणाचा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाशी काही संबध आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. या प्रकारामुळे हिंदूत्ववादी संघटना पुन्हा एकदा रडारवर आल्या आहे. गोंधळेकर याच्याबरोबर आणखी कोण होते का? याचा तपास पोलिसांकडून सुरू झाला आहे. 

अंनिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे अंधश्रध्दा निर्मुलनावर मोठे कार्य होते. त्यामुळे अनेक हिंदूत्ववादी संघटनांकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र येत होते. त्यानंतर त्यांचा सुमारे 5 वर्षांपूर्वी पुण्यात खून करण्यात आला होता. डॉ. दाभोलकर यांचा खून हिंदूत्ववादी संघटनांकडूनच झाल्याचा आरोप अंनिसने केला होता. त्यानंतर कोल्हापूर येथे कॉ. गोविंद पानसरे यांचाही खून झाला होता. हे दोेघेही पुरोगामी असल्याने त्यांच्या खुनाचा परस्पर संबध असल्याचे तपासात उघड झाले होेते. या प्रकरणात कोल्हापूर व सांगलीतून काही हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. यामधील डॉ. विरेंद्र तावडे या दाभोलकर खून प्रकरणातील संशयित आरोपीचे वास्तव्य सातारा शहरात अनेक वर्षे होते. 

पोलिसांच्या तपासात डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांना एकाच बंदुकीने गोळ्या घातल्याचे समोर आले होते. यावरून पोलिसांनी नागोरी याला बंदूक हताळणी व विक्रीप्रकरणी अटक केली होती.  नागोरी याने या बंदूकांची विक्री सातार्‍यातील काही जणांना केली होती. त्यावरून पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यातही घेतले होते. त्यामुळे डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचे सातारा कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. नालासोपारा येथे बॉम्ब व साहित्य सापडल्यानंतर चौकशीनंतर सुधन्वा गोंधळेकर याला पुण्यातून अटक करण्यात आली. गोंधळेकर याचे कुटुंब सनातन संस्थेशी सलग्‍न आहे.

तर गोंधळेकर हा शिवप्रतिष्ठानमध्ये सक्रीय कार्यकर्ता म्हणून काम करत होता. खून व बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये यापूर्वी सनातन संस्थेचे नाव आले होते. मात्र, यंदा प्रथमच शिव प्र्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे नाव समोर आल्यानंतर जिल्हा पोलिसांकडून हिंदूत्ववादी संघटना रडारवर आल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातही शिव प्रतिष्ठान संघटनेचे वलय मोठे आहे. त्यामुळे या संघटनेकडे अनेक तरूण आर्कर्षित होत असतात. मात्र, प्रथमच विघातक कृत्यांमध्ये संघटनेच्या कार्यकर्त्याचे नाव समोर आल्यामुळे अनेकांची घाबरगुंडी उडाली आहे. बॉम्बस्फोटाचे कनेक्शन सातार्‍यात असल्याने सातारा पोलिसांकडूनही त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. गोंधळेकर याच्या जवळ कोण कोण होते याबाबतची माहिती घेण्यास सुरूवात झाली आहे. 

विघातक कृत्य करणार्‍यांसाठी सातारा ‘सेफ’

दाभोलकर प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पुण्यामध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये ज्या दुचाकीचा वापर करण्यात आला होता. ती दुचाकी सातार्‍यातील एका पोलिसाची होती. ही दुचाकी जिल्हा न्यायालयाच्या आवारातून चोरीला गेली होती. याच दुचाकीचा बॉम्बस्फोट करण्यासाठी वापर करण्यात आला होता. त्यामुळे शांतताप्रिय असणार्‍या सातारा आता  विघातक कृत्य करणार्‍यांसाठी ‘सेफ’ जागा ठरू लागली आहे. शांत डोके ठेवून हे प्लॅन केले जात आहे. सातार्‍यापासून मुंबई व पुणे थोड्याच अंतरावर असल्याने याचा योग्य पध्दतीने वापर करण्यात विघातक कृत्य करणारे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे सातार्‍याचे दहशतवादाचे थेट कनेक्शन समोर येत असल्याने शांतता नांदत असलेला सातार्‍यात आता अप्रिय घटना वाढू लागल्या आहेत.