Thu, Jul 18, 2019 01:03होमपेज › Satara › महामार्गावर सुरक्षिततेकडे कानाडोळा

महामार्गावर सुरक्षिततेकडे कानाडोळा

Published On: Aug 21 2018 1:40AM | Last Updated: Aug 20 2018 8:39PMतासवडे टोलनाका : प्रवीण माळी 

दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढूनही टोल कमी होण्याऐवजी होणारी वाढ अन् महामार्गावरील सोयी- सुविधांच्या नावाने सुरू असणारी बोंब सर्वांनाच माहिती आहे. एकीकडे असे असतानाच शुक्रवारी महामार्ग देखभाल दुरुस्ती पथकाच्या अजब कारभाराचा नमुना पहावयास मिळाला. त्यामुळेच केवळ अपघात झाल्यानंतरच हे पथक मदतीसाठी येणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

2006 साली पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण करण्यात आले. महामार्गावरील अपघात, नादुरुस्त वाहने तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत रहावी, म्हणून करावयाच्या आवश्यक त्या उपाययोजनांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एका कंपनीला देखभाल व दुरुस्तीचा ठेका दिला आहे. मात्र महामार्ग व सेवा रस्त्यालगतच्या नाल्याची अवस्था, हॉटेल चालकांनी मनमानीपणे काढलेले जोडरस्ते पाहता देखभाल व दुरुस्ती कंपनीचा ठेका असणारे पथक केवळ महामार्गावर अपघात झाल्यानंतर मदत करण्याची जबाबदारी पार पाडत असल्याचे पहावयास मिळते.

शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास वनवासमाची गावच्या हद्दीत महामार्गावर मध्यभागीच एक दूध टँकर नादुरुस्त झाला होता. महामार्गावर पाठीमागून येणार्‍या वाहनचालकांना त्यामुळे आपल्या वाहनांवर ताबा मिळवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळेच अपघात होण्याची शक्यता लक्षात घेत यांची माहिती देखभाल व दुरुस्ती पथकास देण्यासाठी वारंवार मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या पथकाने प्रतिसाद न दिल्याने कोल्हापूरमधील वरीष्ठ अधिकार्‍यांना मोबाईलवरून संपर्क करण्यात आला. त्यानंतर त्यांनी पथकातील कर्मचार्‍यांना केवळ फोन करण्यास सांगतो, असे उत्तर मिळाले. तर संबंधित कर्मचार्‍यांनी तब्बल 20 मिनिटांनी पुन्हा फोन करून माहिती घेतली. मात्र शेवटपर्यंत हे पथक आलेच नाही. दरम्यान, संबंधित टँकर चालकाकडे दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य नव्हते. त्यामुळे दुसर्‍या वाहनांना थांबवून त्यांच्याकडून साहित्य घेऊन तात्पुरती दुरुस्ती केल्यानंतर तो टँकर महामार्गालगत घेण्यात यश आले. महामार्गावर मध्यभागी टँकर जवळपास एक तास उभा होता. सुदैवाने या कालावधीत कोणताही अपघात घडला नाही. मात्र या प्रकारामुळे महामार्ग देखभाल व दुरुस्ती पथक कशासाठी आहे? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.