Wed, May 27, 2020 08:40होमपेज › Satara › इथे पावसाळ्यात घराबाहेर जात नाहीत

इथे पावसाळ्यात घराबाहेर जात नाहीत

Published On: Aug 30 2018 1:32AM | Last Updated: Aug 29 2018 7:53PMकराड : प्रतिभा राजे 

गुडघाभर चिखल, पावसाळ्यातील पाण्याने भरलेले मोठमोठे खड्डे यामुळे शहरातील कार्वेनाका, सुमंगलनगर, पोस्टल कॉलनीमधील ज्येष्ठ नागरिक पावसाळ्यात घराबाहेर पडत नाहीत तर पंधरा— पंधरा दिवस विद्यार्थी शाळेत जात नाहीत. खड्ड्यात पडून अनेक वाहनधारक व नागरिक पडून जखमी झाली असल्याने या ठिकाणच्या नागरिकांना घराबाहेर पडणे म्हणजे मुश्किल होऊन बसले आहे. दारातच चिखलाचा राडा असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. 

गेल्या अनेक वर्षापासून शहरातील कार्वेनाका, सुमंगलनगरच्या रस्त्यांची परिस्थिती भयानक होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणच्या नागरिकांना रस्त्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अक्षरश: गुडघाभर चिखल या रस्त्यावर झाला आहे. रस्त्यावर असणारे मोठ मोठे खड्डे  पावसाच्या पाण्याने भरून गेल्याने खड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारक, पादचारी खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याची घसरगुंडी झाल्याने पाय घसरून पादचारी पडत आहेत. वाहनधारकांना वाहन चालवताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. रस्ता शोधणे अक्षरश: अवघड झाले आहे. यामुळे पावसाळ्यात या ठिकाणचे वयोवृध्द नागरिक बाहेर पडत नाहीत. तर चिमुकल्यांना शाळेत जाताना कसरत करावी लागत असल्याने पालक  शाळेत पाठवत नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. येथील अर्बन बँकेच्या पाठीमागे तर दलदलीचे साम्राज्य झाले आहे. सुमंगल नगरमध्ये काही ठिकाणचे खड्डे एवढे मोठे आहेत की त्यामध्ये चुकून एखाद्याचा पाय अडकला तर बाहेर येणे मुश्किल होईल. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर याठिकाणचे नागरिक पालिकेत याबाबतची तक्रार करत  रस्त्याची मागणी करतात मात्र एकदाही याकडे लक्ष दिले नाही, असे नागरिक सांगतात. 

सुविधा नाही पण कर वसुलीसाठी मात्र तत्परता

कराड शहराचा  हा वाढीव भाग आहे. हा भाग गेल्या दोन वर्षापासून हा भाग शहरात समाविष्ठ करण्यात आला आहे. त्यामुळे दोन वर्षापासून पालिका नागरिकांकडून पाणीपट्टी, घरपट्टी आदी कर वसूल करत आहे. मात्र त्याप्रमाणात सुविधा देत नाही त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्‍त होत आहे. जर सुविधा देत नाहीत तर कर वसूल करायला मात्र पालिकेचे अधिकारी, कर्मचारी वेळेत कसे काय येतात? अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. या प्रभागातील  नगरसेवक व नगरसेविकांचे या भागाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. 

कमी दाबाने पाणीपुरवठा

या भागात दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. मात्र तो अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र जावे लागते, असे नागरिकांनी सांगितले त्यामुळे पाणीपट्टी घेणार्‍या पालिकेने पाणी पुरेशा प्रमाणात सोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.