Sun, Apr 21, 2019 04:21होमपेज › Satara › सैदापुरातील हेमाडपंथीय महादेव मंदिर 

कराड, पाटणचा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित

Published On: May 21 2018 1:19AM | Last Updated: May 20 2018 8:42PMकराडसह पाटण तालुक्यात अनेक ठिकाणांचा पर्यटनाच्या द‍ृष्टीने विकास झाला आहे. काही ठिकाणांना अलीकडेच ‘क’ वर्ग पर्यटनाचा दर्जा मिळाला असला तरीही अनेक ठिकाणे आजही दुर्लक्षित आहेत. शासनाने आजवर या दुर्लक्षित ठिकाणांकडे पाहिलेही नाही. त्यामुळे ही ठिकाणे आज शेवटची घटका मोजत आहेत. ही ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करत असून शासनाने याचा विकास केल्यास येथे पर्यटकांचा ओढा निश्‍चितच वाढेल. दुर्लक्षित ठिकाणांमध्ये पौराणिक व ऐतिहासिक ठिकाणांचा समावेश असून या ठिकाणांचा विकास करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. हा इतिहसाचा ठेवा जतन करण्याचा प्रयत्न केल्यास पर्यटकांची पावले आपोआप या ठिकाणांकडे वळतील. पर्यटनाच्या द‍ृष्टीने विकसित होऊ शकतात. अशा ठिकाणांचा दै. ‘पुढारी’ने घेतलेला आढावा... 
 

कराडः अशोक मोहने 

सैदापूर (कराड) येथे कृष्णा-  कोयना प्रीतिसंगमावर वसलेले आणि पौराणिकतेची साक्ष देणारे हेमाडपंथीय महादेव मंदिर आहे. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना या महादेव मंदिराच्या रूपाने पहायला मिळत आहे. साधारण दीडशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर असल्याचे ग्रामस्थ सांगतात. हे मंदिर दुर्लक्षित झाल्याने त्याचे भग्नावशेष उरले आहेत. त्यामुळे इतिहासकालीन ही वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 
हे मंदिर पूर्ण दगडात बांधलेले असून त्यावर सुबक नक्षीकाम कोरलेले आहे. संपूर्ण मंदिर व मंदिराचा गाभारा दगडी बांधकामात असून त्याला आतून घुमटाचा आकार आहे. गाभार्‍यात  महादेवाची पिंड आहे. हे मंदिर पूर्वमुखी आहे. 

मंदिराभोवती मजबूत तटबंदी आहे. मात्र, त्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वारही दगडी बांधकामात आहे. प्रवेशद्वारावर दगडात कोरलेली शिल्पे आहेत. एवढ्या वर्षांनंतरही त्याचे मूळ स्वरूपातील अवशेष त्याच्या पौराणिकतेची साक्ष देत आहेत. जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या या मंदिराला कराड परिसरासह तालुक्यातून भाविक सोमवारी भेट देतात. काही भाविक त्यांना आलेल्या अनुभूतीतून दर सोमवारी पिंडीला मंत्रोपचारात अभिषेक  घालतात. 

मंदिराच्या नावे वीस गुंठे जागा आहे. तशी नोंद सैदापूर ग्रामपंचायत दफ्तरी आहे. गेल्या शंभर, दीडशे वर्षांत या मंदिराकडे  ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने ही इतिहासकालीन वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 

सैदापूरचे माजी उपसरपंच मोहनराव जाधव यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या  निदर्शनास ही बाब आणून दिली होती. या मंदिराला ‘क’ वर्ग देवस्थानचा दर्जा मिळावी, अशी मागणीही केली होती. याबाबत चव्हाण यांनी ‘क’ वर्ग दर्जाची घोषणा केली होती. मात्र, नंतरच्या काळात ग्रामपंचायतीकडून आवश्यक पाठपुरावा न झाल्याने हा प्रस्ताव बारगळला. 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर मोहनराव जाधव व ग्रामस्थांनी हा प्रस्ताव मांडला. त्यांनीही याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करण्यास त्यांनी सांगितले आहे. मात्र, पुढे काहीच झाले नाही. 

या मंदिराचा ‘क’ वर्ग देवस्थानमध्ये समावेश झाल्यास हे मंदिर नव्या रूपात दिसेल. शिवाय भाविकांना राहण्याची सोय, वीज, पाणी उपलब्ध होईल.  रेणुका देवी मंदिराला परशुरामांनी भेट दिली होती. तशी भेट याही मंदिराला झाली असावी असे ग्रामस्थ सांगतात.  त्यामुळे मंदिराची डागडुजी करण्याची गरज आहे.