Wed, May 27, 2020 08:32होमपेज › Satara › बेवारस वाहनांचा धनी शोधणार कधी?

बेवारस वाहनांचा धनी शोधणार कधी?

Published On: Dec 02 2017 12:36AM | Last Updated: Dec 01 2017 9:52PM

बुकमार्क करा

सातारा : सुशांत पाटील

सातारा शहर परिसरात बहुतांशी रस्त्यावर बेवारस वाहने उभी आहेत. ही वाहने कित्येक दिवसापासून धूळ खात पडली आहेत. त्यामुळे शहराच्या  विद्रुपीकरणात भर पडत आहे. रस्त्याच्या कडेला असणारी ही वाहने धोकादायक ठरत असून अशा बेवारस वाहनांचा धनी शोधणार तरी कधी? असा सवाल सातारकरांनी प्रशासनाला केला आहे.

सातार्‍यातील मुख्य पेठेत जागोजागी बेवारस वाहने आढळून येतात. ही वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी केली असल्यामुळे अपघाताला निमंत्रण देत आहेत. रात्रीच्या वेळी अशा वाहनांमुळे अपघाताचे प्रसंगही उदभवलेले आहेत. तरी देखील पोलीस प्रशासन याबाबत कोणतीच कारवाई करत नाही.

एकीकडे  पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीच्या नियमांबाबत कडक अंमलबजावणी होते. सातार्‍यातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या  प्रश्‍नाला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत. रस्त्यावर  नो पार्किंगमध्ये एखादे वाहन अथवा चारचाकी लावलेली दिसली की वाहतूक पोलीस त्या वाहनावर लगेचच कारवाई करतात. शहरातील एकेरी वाहतूक व्यवस्था मोडणार्‍यांवर देखील वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. दुसरीकडे मात्र सातार्‍यातील रविवार पेठ, शनिवार पेठ, गुरुवार पेठ, पोलीस मुख्यालयासमोर, मल्हार पेठ, गोडोली परिसर,  झेडपी रोड, केसरकर पेठ तसेच शहरातील  बर्‍याच गॅरेजच्या बाहेर कोणत्याही कारवाईची तमा न बाळगता रस्त्यावरच नादुरुस्त, अपघातग्रस्त वाहने धूळखात पडलेली आहेत. 

भंगार वाहनावर कारवाई कधी होणार?

एरवी नो पार्किंगला काही अवधी जरी वाहन पार्क केले असले तरी वाहतूक पोलिसांच्या क्रेनने वाहन उचललेले असते. मात्र,  बेवारस वाहने महिनोन महिने रस्त्याकडेला धूळखात पडलेली असूनदेखील त्या वाहनांवर कारवाई का होत नाही? असा सवाल नागरिक करु लागले आहेत.