Tue, Mar 19, 2019 11:20होमपेज › Satara › जलसंधारणासाठी लागेल ती मदत : शरद पवार

जलसंधारणासाठी लागेल ती मदत : शरद पवार

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:13PMखटाव / वडूज  : प्रतिनिधी

ज्यांनी महाराष्ट्राचे नाव जगात मोठे केले त्या चव्हाण साहेबांच्या विचाराची माणसे खटाव तालुक्यात आहेत. त्यांच्या विचारासारखेच जलसंधारणाचे मोठे काम या भागात लोकसहभागातून केले जात आहे. हे काम सुरुच ठेवा, लागेल ती मदत आम्ही करु, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिली.

मांडवे (ता. खटाव) येथे जलसंधारण कामांची पहाणी केल्यानंतर गावकर्‍यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते -पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, सभापती संदीप मांडवे, रमेश पाटोळे,  प्रा. अर्जुन खाडे, सरपंच भाग्यश्री पाटील,  उपसरपंच रत्नमाला चंदनशिवे  आणि श्रमदाते उपस्थित होते. 

शरद पवार पुढे म्हणाले, जलसंधारणाचे सुरु असलेली ही कामे करायला कुणी सांगितले नाही आणि या कामासाठी रोजगारही मिळत नाही, तरीही महिलांसह अबालवृद्ध श्रमदान करत आहेत. मुंबईचे चाकरमानीही या कामात जमेल तेवढे योगदान देत आहेत. पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून दुष्काळाचे दुखणे कायमचे घालवण्यासाठी इथले ग्रामस्थ संघर्ष करत असून महाराष्ट्राला आदर्शवत असे काम या भागात होत आहे.

माजी आमदार प्रभाकर घार्गे म्हणाले, माढ्याचे प्रतिनिधित्व करताना पवार साहेबांनी माण आणि खटावच्या दुष्काळी भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या वर्षी त्यांनी जलसंधारण कामांसाठी एक कोटींचा निधी दिला होता. आताही जिल्हा बँक, जिल्हा परिषद आणि विविध संस्थांच्या माध्यमातून ते या कामांसाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन देत आहेत. दोन्ही तालुक्यातील अनेक गावे दुष्काळ हटविण्यासाठी एक झाली आहेत. श्रमदानाबरोबरच सेवाभावी संस्थांकडून मशिनरी आणि डीपीसीतून इंधनासाठी निधीची तरतूद केली जात आहे.  

लोकसहभागातून होणार्‍या जलसंधारणासाठी सरपंच भाग्यश्री पाटील यांनी एक लाख, मुंबई नोकरवर्ग संघटनेने सव्वा लाखांची मदत दिली. सेवाभावी संस्थांनीही मांडवेतील कामांसाठी मशिनरी उपलब्ध करुन दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पांडुरंग खाडे  यांनी केले. आभार  संदीप मांडवे  यांनी मानले.

10 लाखांपेक्षा तुमच्या मतांची किंमत मोठी

शरद पवार यांनी माढ्याचे खासदार असताना मांडवे येथील सभागृहासाठी  10 लाखांचा निधी दिल्याची आठवण ग्रामस्थांनी काढली. यावर बोलताना पवार म्हणाले, तुम्ही आणि या भागाने मला मते मागायला न येता  95 टक्के  मते दिली होती. माझ्या 10 लाखांच्या निधीपेक्षा तुमच्या मतांची किंमत फार मोठी आहे. 

 

Tags : satara, satara news, water conservation, Sharad Pawar, Help,