Tue, Nov 20, 2018 23:17होमपेज › Satara › रस्त्यावरील अनाथांचा तो कैवारी (Video)

रस्त्यावरील अनाथांचा तो कैवारी (Video)

Published On: Feb 17 2018 4:17PM | Last Updated: Feb 17 2018 4:17PMसातारा : सुशांत पाटील

आज कुटुंबातील काही कारणामुळं रस्त्यावरचं जीणं जगणारी अनेक माणसं आपण पाहतो. या अनाथांना खूप काही करायचं असतं पण त्यांचे हात दगडाखाली अडकलेले असतात. त्यामुळे त्यांना रस्त्यावरचं जीणं म्हणजेच अधिक चांगलं वाटू लागतं. मात्र या लोकांना हक्काचं घर उपलब्ध व्हावं यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शिव ऋण प्रतिष्ठान काम करत आहे. रस्त्यावर जगणार्‍या अवघ्या बारा वर्षाच्या मुलाला प्रतिष्ठानचे अक्षय बोऱ्हाडे यांनी आपल्या स्वत:च्या गाडीतून घरी घेवून जातानाचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या अनाथ मुलाच्या स्वप्नाला उभारी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे अक्षयने फेसबुक अकाऊंटवरुन सांगितले आहे.

आज शहरांमध्ये आर्थिक चणचण व कौटुंबिक अडचणींमुळे अनेकांना रस्त्यावर  दिवस काढावे लागत आहेत. शिव ऋण संस्थेमार्फत एक सामाजिक बांधिलकी म्हणून अशा मुलांना आधार देण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून केले जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील १५ ते १६ जणांना आधार देण्याचे काम त्यांनी केले आहे. तसेच अनाथांच्या देखभालीचे व्हिडीओ देखील फेसबुक अकाऊंटवरुन सतत अपडेट करत असतात. त्याच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

आळंदीतील बारा वर्षाच्या ज्ञानेश्वरचे आई वडील वारल्यामुळे रस्त्यावरचं जगणं स्विकारावं लागलं. गेल्या दोन वर्षापासून तो मंदिर परिसरात राहत होता. पोवाडा, आईवरची हृदयस्पर्शी कविता म्हणत जीवन जगत होता. याची माहिती शिव ऋण युवा प्रतिष्ठानला मिळताच अक्षय त्याच्या सहकार्‍यासह आळंदीला पोहचला. त्यावेळी ज्ञानेश्वर अगदी व्याकूळ होऊन रस्त्यावरील जगण्याची दुनियादारी सांगू लागला. रस्त्यावर जगाताना आलेले काही वाईट अनुभव त्याने सांगितले. त्याच्याशी कुणी प्रेमाने चार शब्द बोलतही नव्हते. तरीही तो या दुनियादारीत कसंतरी आपलं पोट भरत होता.

वेदनादायी कथा ऐकून घेतल्यानंतर अक्षयने ज्ञानेश्वरला सोबत घेत ‘आजपासून तू माझा भाऊ, तुला काही कमी पडू देणार नाही’असे म्हटले. यावेळी अक्षयने महाराष्ट्रातील असणार्‍या निराधार लोकांसाठी मदत कार्य सुरु ठेवणार असल्याचे सांगितले. जर कोणाला आपल्या परिसरात असे निराधार सापडले तर त्याबद्दल महिती देण्याचे आवाहन अक्षयने आपल्या फेसबुक अकाऊंट वरुन केले आहे.