Thu, Jul 18, 2019 09:00होमपेज › Satara › सातारकर औषधाला महाग!

सातारकर औषधाला महाग!

Published On: Jul 28 2018 1:41AM | Last Updated: Jul 27 2018 10:37PMकराड : अशोक मोहने

शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्या औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सर्दी, तापावरील औषधांचा पूर्ण डोस देण्याइतकीही औषधे प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नाहीत. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यभर कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे. 

औषध खरेदीतील घोटाळ्यांमुळे संपूर्ण राज्याच्या औषध खरेदीची जबाबदारी शासनाच्या अधिपत्याखालील हाफकिन इन्स्टिट्यूटवर सोपविण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडून विविध औषध कंपन्यांकडील टेंडर प्रक्रिया अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. 

औषध पुरवठा सुरळीत व्हायला अजून सहा महिने लागतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र, तो पर्यंत जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामधील रोजची ओपीडी चालवायची कशी हा प्रश्‍न वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरांसमोर उभा ठाकला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात ही औषध टंचाई निर्माण झाली आहे. 

एकट्या सातारा जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यात 71 प्राथमिक आरोग्य केंद्र व 400 उपकेंद्र आहेत. तसेच 2 जिल्हा रुग्णालय व साधारण 15 ग्रामीण रुग्णालये आहेत. 313 प्रकारची औषधे या रुग्णालयांना पुरविली जातात. यामध्ये अ‍ॅन्टीबायोटिक, कफशिरफ या औषधांची मागणी अधिक असते. मात्र या औषधांचा पुरेसा साठाही उपलब्ध नाही. रक्‍तदाब व मधुमेहाची औषधेही नाहीत. 
ताप, थंडीच्या रुग्णांना औषधाचा पूर्ण डोस देण्याइतकीही औषधे आरोग्य केंद्रात नाहीत. अन्य आजारांवरील औषधांची तर बोंबच आहे. एक-दोन वेळच्या गोळ्या रुग्णांच्या हातावर टेकवून आरोग्य केंद्रांकडून वेळ मारून नेली जात आहे. अपुर्‍या औषधांच्या डोसमुळे रुग्ण कितपत बरा होतो याबाबत प्रश्‍नचिन्हच आहे.  सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. या दिवसात साथींच्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो. या परिस्थितीत निर्माण झालेली औषध टंचाई रुग्णांच्या जीवावर उठली आहे. 

दरम्यान, जिल्हा परिषदेकडे असणारा सेसफंड व ग्रामनिधीतून औषधे खरेदी करण्यात यावीत. असे आदेश जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांमार्फत पंचायत समितीस्तरावर पाठविण्यात आल्याचे जिल्हा औषध निर्माण अधिकारी शहाजी गुजर यांनी सांगितले. शासन स्तरावर आरोग्याच्या अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी या योजनांची फलनिष्पत्ती काय हे सहा महिन्यांपासून राज्यभर निर्माण झालेल्या औषध टंचाईवरून दिसून येत आहे.