Mon, Jul 22, 2019 02:38होमपेज › Satara › वळवाचे तांडव; भिंत कोसळून महिला ठार 

वळवाचे तांडव; भिंत कोसळून महिला ठार 

Published On: May 29 2018 1:30AM | Last Updated: May 29 2018 12:38AMसातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यात ठिकठिकाणी रविवारी सायंकाळपासून सोमवारी पहाटेपर्यंत वळीव पावसाने अक्षरश: तांडवनृत्य केले. धडकी भरवणारे वादळी वारे, थरकाप उडवणारा विजेचा लखलखाट, विजेअभावी निर्माण झालेला काळाकुट्ट अंधार, अशा भेदरलेल्या वातावरणात वळवाने थैमान घातले. फलटणमध्ये तर हाहाकार उडाला. 216 पेक्षा अधिक घरांची पडझड झाली.  झिरपवाडी येथे नवीन घराची भिंत कोसळून छाया साहेबराव जाधव (वय 52) ही महिला ठार झाली. तर सोनवडी बुद्रुक येथे दोघे जखमी झाले असून आसू येथे एक म्हैस ठार झाली. जिल्ह्यात अन्यत्रही घरे  पडली, वृक्ष उन्मळले, वाहतूक कोलमडण्याचे प्रकार घडले. 

वळवाच्या पावसाने रविवारी रात्री जिल्ह्यात आकांडतांडव केले. सर्वात जास्त फटका फलटण तालुक्याला बसला असून येथे वादळी वार्‍याने शहरासह ग्रामीण भागात 216 पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले. महसूल विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत सरासरी 76 लाख 47 हजार 216 रुपयांचे नुकसान झाले असून नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अनेक घरांचे पत्रे उडून संसारोपयोगी साहित्य भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.  डाळिंब, केळी, आंबा, बोर अशा पिंकाचे नुकसान झाल्याने 16 शेतकर्‍यांचे मिळून 14 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

झिरपवाडी येथे छाया साहेबराव जाधव यांच्या नवीन  घराचे बांधकाम सुरू होते. अचानक आलेल्या वादळी वार्‍यात व पावसात त्या सिमेंट व इतर साहित्य झाकण्यास गेल्या असता सोसाट्याच्या वार्‍यामुळे नवीन बांधकामाची भिंत पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोनवडी बुद्रक येथील सदाशिव तात्याबा खिलारे व त्यांचे बंधू यशवंत तात्याबा खिलारे या दोघांच्या अंगावर भिंत कोसळून दोघे गंभीर जखमी झाले. असून येथील अनिल दत्तात्रय पवार यांची म्हैस ठार झाली. शहरातील शंकर मार्केट परिसरात  डॉ. जगताप यांच्या कारवर झाड पडल्याने कारचा चक्‍काचूर झाला. फरांदवाडी येथे दोन मोटारसायकलवर झाड कोसळून नुकसान झाले.

जावली तालुक्यात इंदवली तर्फ कुडाळच्या शाळेचे पत्रे उडून गेले तर अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला. कुडाळ, करहर परिसरात तर तब्बल 17 तास वीज गायब राहिल्याने नागरिकांचे हाल झाले. 

खटाव तालुक्यात खटाव, पुसेगाव, बुध, डिस्कळ या भागात जोराच्या वार्‍याने अनेक ठिकाणी जनावरांचे गोठे, फ्लेक्स बोर्ड उडून गेले. काही ठिकाणी लाईटचे खांब आणि झाडे उन्मळून पडली. 
खटावमध्ये  बाजारपेठेतील फ्लेक्सबोर्ड भिंतीसह ढासळला तर किसन  शिंदे यांचे जनावरांचे पत्र्याचे शेड उडून गेले. ललगुण, डिस्कळ तसेच खटावच्या पिंपळेश्‍वर मंदिर परिसरात झाडे उन्मळून पडली.  अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने रात्रभर वीजपुरवठा खंडित होता. 

कोरेगाव तालुक्यात किन्हई, रहिमतपूर, कोरेगाव परिसरात  रविवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान विजांचा लखलखाट व ढगांच्या गडगडाटात झालेल्या वादळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान केले. झाडे उन्मळून पडल्याने ठिकठिकाणची वाहतूक कोलमडली. कोरेगाव-कराड मार्गावरील वाहतूक तर रात्रभर ठप्प राहिली. याशिवाय जिल्ह्यात ठिकठिकाणी वळवाने नासधूस केली असून अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या व वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या.