Thu, Jul 18, 2019 02:06होमपेज › Satara › पावसाने दुसर्‍या दिवशीही पडझड

पावसाने दुसर्‍या दिवशीही पडझड

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 11:27PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून धरणांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. धुवाधार पावसामुळे दुसर्‍या दिवशीही पडझड सुरूच राहिली. मानकरवाडी, ता. जावली येथे घराची भिंत पडली, तर रेवंडे घाटात दरड कोसळली आहे. महाबळेश्‍वरमध्येही जोरदार पाऊस सुरू असून दुर्गम भाग असलेला चतुरबेट परिसर जलमय झाला आहे. 

सातारा शहरातही संततधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा तालुक्याच्या पश्‍चिमेस जोरदार पाऊस पडत असल्याने रेवंडे येथील घाटात मंगळवारी सकाळी 8 च्या सुमारास पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून नागरिकांना दुसर्‍या मार्गाचा वापर करावा लागत आहे.

चार वर्षांपूर्वी आरे-दरे येथून बांधकाम विभागाने पंतप्रधान सडक योजनेतून रेवंडेसह वावदरे, बेंडवाडी येथील ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी हा  घाटरस्ता तयार करण्यात आला पण या घाट रस्तात वारंवार दरडी कोसळू लागल्याने  त्या धोकादायक होऊ लागल्या आहेत. या भागात सोमवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यातून आज सकाळी 8 च्या सुमारास घाटातील एका मोठ्या वळणानजिक मोठ्या दगडांसह दरडीचा भाग मुख्य डांबरी रस्त्यावर कोसळला आहे. त्यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. गत आठवड्यातही याच घाटात दरड कोसळली होती.  घाटरस्ता बंद झाल्यामुळे येथील लोकांना 12 किलोमीटरचा वळसा घालून सातारा- ठोसेघर रस्त्याने राजापुरी, बोरणे मार्गे जावे लागत आहे. 

यवतेश्‍वर घाटात पॉवर हाऊसजवळ दरड कोसळल्याने कास, बामणोलीकडे जाणारी वाहतूक मंगळवारी रात्री ठप्प झाली. मोठमोठे दगड तसेच झाडे रस्त्यावर खाली आल्याने रस्ता अरुंद बनला असून वाहतूक विस्कळीत झाली.

जिल्ह्यात घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. दरडींमुळे घाटमाथ्यावरील रस्ते अत्यंत धोकादायक बनले आहेत.  मंगळवारी रात्री सातारा पालिकेच्या यवतेश्‍वर घाटातील पॉवर हाऊसजवळ कासकडे जाताना लागणार्‍या पहिल्याच वळणावर मोठी दरड कोसळली. या दरडीबरोबर डोंगरउतारावरील पावसाने मोकळी झालेली माती व मुरुमासह मोठी झाडेही रस्त्यावर आली.  त्यामुळे रात्रीच्यावेळी कास, बामणोलीकडे जाणारी तसेच सातार्‍याकडे येणारी वाहने याठिकाणी अडकून पडली. दरड पडल्याची माहिती सार्वजनिक बांधकामच्या पूर्व विभागाला देण्यात आली. सतर्क असणार्‍या वाहनचालकांनी  सातारा तालुका पोलिस ठाण्यालाही याबाबत कळवले. गेल्या वर्षी याच मार्गाचा काही भाग खचला होता. त्यामुळे बरेच दिवस वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. अचानक दरड कोसळल्यामुळे पुन्हा वाहतूक विस्कळीत झाली. सातत्याने अशा समस्यांचा सामना करावा लागत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या घाटाची पाहणी करुन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

मानकरवाडीत घराची भिंत कोसळली
कुडाळ : प्रतिनिधी

जावली तालुक्यातील मानकरवाडी येथील एका घराची भिंत कोसळली आहे. सुदैवाने जीवीतहाणी झाली नाही. जावलीसह परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून कुडाळी नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. कुडाळ ते मेढा दरम्यान मालदेव घाटात डोंगर ऊतारावरुन कोसळणारे धबधबे पर्यटकांना भूरळ पाडत आहेत.

संततधार कोसळत असलेल्या पावसाने मानकरवाडी येथील सखाराम विठोबा जाधव यांच्या घराची भिंत मध्यरात्री कोसळली. जाधव कुटुंबिय भिंती जवळच झोपले होते. मात्र भिंत बाहेरच्या बाजूला पडल्याने अर्नथ टळला. या घटनेचा पंचनामा करुन जाधव यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

भिलार परिसरात जनजीवन विस्कळीत
भिलार : वार्ताहर 

पाचगणीसह भिलार परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी वीज व पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे.  

पाचगणी या गिरीस्थानावर पावसाची बॅटिंग चालू असून शहरात वीज जाण्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांना अंधारात बसावे लागत आहे. वीज खंडीत होत असल्याने  ऐन पावसाळ्यात पाचगणीत काही भागात  पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत  आहेत.

ग्रामीण परिसरातही पावसाची कोसळधार कायम असल्याने संपूर्ण शेती जलमय झाली आहे. काटवली, हातगेघर, रुईघर, खर्शी परिसरात पावसाने भात लागणीला वेग आला आहे. शेतात पाणी साचल्याने काही भागात रोपे काढण्यास अडचण निर्माण होत आहे. कुडाळी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदी पलीकडील भात लागण ठप्प झाली आहे. तसेच महू धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.