Thu, Aug 22, 2019 03:52होमपेज › Satara › जिल्ह्यात जोरदार पाऊस

जिल्ह्यात जोरदार पाऊस

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 18 2018 12:29AMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावली, तर सातारा शहर परिसरात सायंकाळी  कोसळलेल्या जोरदार पावसामुळे नागरिक सुखावले असून बालचमूने पावसात भिजण्याचा आनंद लुटला.

सातारा शहरात उन्हाचा पारा दिवेंसदिवस वाढू लागला आहे. गुरुवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण झाल्याने जोरदार पाऊस पडण्याची अटकळ निर्माण झाली होती. जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस झाला असताना सातारा शहरात मात्र पावसाची हुलकावणी होती. अखेर गुरुवारी सायंकाळी 6. 30 वाजता मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसामुळे सातारकरांची त्रेधातिरपीट उडाली. मात्र, अर्धा तासाच्या आतच पावसाने पुन्हा दडी मारली. जोरदार पाऊस झाल्यानंतरही हवेत कमालीचा उष्मा जाणवत होता. पावसामुळे ठिकठिकाणी पाणीच पाणी साचले होते. सुमारे अर्ध्या तासानंतर मात्र पावसाने उघडीप दिली. मुसळधारानंतर पुन्हा पावसाची रिमझिम सुरु होती. सातारा शहरासह उपनगरांतील विजेचा खेळखंडोबा सुरु होता. यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

दरम्यान, तालीम संघ मैदानावर सातारा नगरपालिकेच्या वतीने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे मैदानावर पाणीच पाणी साचल्याने  संयोजकांना आजचा कार्यक्रम उद्यावर ढकलावा लागला.

महाबळेश्‍वरात पाऊस

महाबळेश्‍वर शहर व परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाचा शिडकावा झाला. अचानक आलेल्या पावसाने उन्हाळी सुट्टीचा आनंद   लुटण्यासाठी पर्यटनास आलेल्या पर्यटकांची एकच धावपळ झाली. 

मात्र, पावसात भिजण्याचा आनंद अनेक पर्यटकांनी लुटला. सकाळपासूनच वातावरणात उष्मा जाणवत होता. सायंकाळी आलेल्या पावसाने वातावरण थंड झाले. उन्हाळी हंगाम असल्याने पर्यटकांची महाबळेश्‍वरमध्ये गर्दी केली असून नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेक, ऑर्थरसीटसह प्रमुख पर्यटनस्थळांवर पर्यटक गर्दी करीत आहेत. शुक्रवारपासून पवित्र रमजान महिन्यास सुरुवात होत असून महाबळेश्‍वरमध्ये मुस्लिम बांधव रमजानच्या तयारीला लागले आहेत.

औंधमध्ये हलक्या सरी

औंध परिसरात आज सायंकाळी सहाच्या सुमारास  पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, कुठेही हानी झाल्याचे वृत्त नाही.

कालपासून वातावरणातील उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला होता. वयस्कर लोक आणि लहान मुलांना या उष्णतेमुळे खूप त्रास झाला होता. उकड्याने हैराण झालेले लोक पावसाच्या प्रतिक्षेत होते. काल रात्री आकाशात वीज चमकत होती.  परंतु, पाऊस आला नाही. दुपारपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. लोकांचे डोळे आकाशाकडे लागले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास वार्‍यासह पावसाचे आगमन झाले. राजाचे कुर्ले, पुसेसावळी परिसरात पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. तर कळंबी, वडी गणेशवाडी, औंध येळीव खरशिंगे, गोपूज आदी ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

कोरेगाव तालुक्यात वार्‍यासह हजेरी

कोरेगाव तालुक्यातील विविध ठिकाणी  गुरुवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वार्‍यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस  झाला. दक्षिण तालुक्यात  विविध गावांसह रहिमतपूर , वाठार किरोलीसह बनवडी पंचक्रोेशीत अर्धा ते पाऊण तास काही ठिकाणी  जोरदार तर बहुसंख्य गावांत हलका ते मध्यम स्वरुपाचा  पाऊस झाला.

गुरुवार हा कोरेगाव व रहिमतपूर येथील आठवडा  बाजाराचा दिवस असतो. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन काहीकाळ विस्कळीत झाले होते. सकाळपासून कोरेगावसह तालुक्यात ढगाळ वातावरण होते. दुपार दोननंतर बहुसंख्य  गावांत अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडला.

कोरेगाव तालुक्यात  आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणांसह प्रचंड ऊकाडा जाणवत होता.अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाच दुपारी दोनच्या सुमारास कोरेगाव तालुक्यात जोरदार वार्‍यासह अर्धा तास ते पाऊण तास पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतरही वातावरणातील उकाडा कमी न होता आणखी वाढला आहे.

Tags : satara news, satara district, Heavy, rain,