होमपेज › Satara › पश्‍चिमेकडे हाहाकार

पश्‍चिमेकडे हाहाकार

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 16 2018 10:53PMसातारा : प्रतिनिधी 

मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हाहाकार उडाला असून अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. महाबळेश्‍वर-पाचगणी रस्ता पाण्याखाली जाऊन काही काळ वाहतूक ठप्प झाली. जावली, सातारा तालुक्यांत घरांच्या भिंती पडल्याच्याही घटना घडल्या. दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढले असून जनजीवन ठप्प झाले आहे. दरम्यान, सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात व नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून कोयना व कृष्णा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील महाबळेश्‍वर, जावली, वाई, सातारा, पाटण, कराड या तालुक्यांत रविवारी पहाटेपासून पावसाने चांगलाच जोर धरला. खंडाळा, कोरेगाव, फलटण, खटाव व माण तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून संततधार कोसळणारा हा पाऊस आता नुकसान पोहोचवू लागला. सोमवारी ठिकठिकाणी पडझड झाली असून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकारही घडले आहेत. 

जिल्ह्यात एकूण 457.34 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली असून गेल्या 24 तासांत सरासरी 41.58  मि.मी. पाऊस झाला आहे. सातारा- 25.98 मि. मी. जावली- 73.67 मि.मी., पाटण- 58.45 मि.मी. कराड 14.15 मि.मी. कोरेगाव 10.39 मि.मी., खटाव- 4.61 मि.मी. माण-2.29 मि.मी. फलटण- 1.56 मि.मी. खंडाळा- 10.85 मि.मी. वाई- 28.80 मि.मी. महाबळेश्वर- 226.60 याप्रमाणे आजपर्यंत एकूण 5346.90 मि.मी. तर सरासरी 486.08 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

पिसाणीत भिंत पडली
कण्हेर : वार्ताहर 
कण्हेर परिसरामध्ये वेळेकामथी पुलावरुन पाणी जात असून पिसाणी येथील शेतकरी किसन धोंडीबा गोगावले यांच्या घराची भिंत व पत्रा कोसळून नुकसान झाले आहे.

कास पूल पाण्याखाली

बामणोली : वार्ताहर
कास बामणोली परिसरात रात्रीपासून पावसाने थैमान घातले असून कास, धावली, बामणोली या भागात जाणारी एस टी सेवा पूर्णपणे कोलमोडून गेली. यामुळे बामणोली भागातील शासकीय व निमशासकीय कार्यालये बंद राहिली. एस. टी. सेवा ठप्प झाली. बामणोली, तेटली, गोगवे या मार्गावरील एकही एस टी बस बामणोलीला गेली नाही.

महाबळेश्‍वर-पाचगणी रस्ता जलमय

महाबळेश्‍वर : वार्ताहर  
गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्‍वर शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून जनजीवन ठप्प झाले आहे. सोमवारी सकाळी मुसळधार पावसाने महाबळेश्‍वर-पाचगणी रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. रविवार व सोमवारी दोन दिवस पावसाचा जोर कायम आहे. वेण्णालेक तुडूंब वाहू लागले आहे. या मुसळधार पावसामुळे महाबळेश्‍वर-पाचगणी या मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. 

गवडीत घराची पडझड

पाचगणी : वार्ताहर
जावली तालुक्यातही दोन दिवसांपासून पावसाचे भिरकीट सुरू आहे. गवडी येथील रघुनाथ बिरामणे याच्या राहत्या घराची छप्पर पावसामुळे कोसळले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. 

कृष्णेच्या पातळीत वाढ

वाई : प्रतिनिधी
कृष्णानदी पात्राच्या पाण्यात वाढ झाली असून पश्‍चिम भागातील भोगाव येथील ओढयावरील पूल पाण्याखाली गेल्याने कित्येक तास वाहतूक ठप्प झाली होती. धोम धरण परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरण 45 टक्के भरले आहे.

खंडाळा तालुक्यात संततधार

खंडाळा: वार्ताहर 
खंडाळा तालुक्यात गत दोन दिवसापासून पावसाची रिपरिप मुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. अधून-मधून बरसाणार्‍या पावसाने बळीराजा सुखावला आहे. सोमवारी सकाळपासून संततधार  पावसाला सुरुवात झाली. या पावसाने शेतकरी सुखावला असून खरीपाच्या झालेल्या पेरणीसाठी  हा  पाऊस पोषक  झाला. तालुक्याच्या पश्‍चिम भागातील असवली, लोहोम, कर्नवडी, अतिट, मिरजे, विंग, गुठाळे, शिंदेवाडी, शिरवळसह  पूर्व भागातही संततधार सुरु आहे