Thu, Sep 20, 2018 18:56होमपेज › Satara › जावलीत विजेचे तांडव; दोघांचा बळी 

जावलीत विजेचे तांडव; दोघांचा बळी 

Published On: Apr 09 2018 1:30AM | Last Updated: Apr 09 2018 1:30AMसातारा/कुडाळ : प्रतिनिधी

जिल्ह्यात ठिकठिकाणी दुसर्‍या दिवशीही अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून आकांडतांडव करणार्‍या विजेने आणखी दोन बळी घेतले.  जावली तालुक्यातील सोनगाव येथे युवा शेतकर्‍याचा तर केळघर येथे एका नागरिकाचा  वीज पडल्याने मृत्यू झाला. सातार्‍यासह जावली, वाई, खटाव तालुक्याला अवकाळीने झोडपून काढले. मेघगर्जनेसह थयथयाट करत हा पाऊस कोसळत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान, या पावसाने दुसर्‍या दिवशीही शेतीचे नुकसान केले. आदिनाथ दिनकर मोरे (वय 32, रा. सोनगाव, ता. जावली) व गणपत  नारकर (वय 43, मंगळवार पेठ, सातारा) यांचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे. शनिवारी ठिकठिकाणी अवकाळी पावसाने दैना उडवल्यानंतर रविवारी दुसर्‍या दिवशीही अवकाळीने झोडपून काढले. विशेषत: विजेच्या तांडवाने त्या त्या ठिकाणी धडकी भरण्यासारखे वातावरण निर्माण होत होते. 

जावली  तालुक्यात रविवारी सलग दुसर्‍या दिवशीही  मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. सोनगाव  येथे  शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळल्याने शेतकरी   आदिनाथ दिनकर मोरे हे ठार झाले. केळघरजवळही विजेने आणखी एक असाच बळी घेतला. गणपत नारकर हे सातार्‍यावरून महाबळेश्‍वरला लग्‍नासाठी दुचाकीवरून चालले होते. केळघर-मेढा रोडवर ओढा पूल येथे ते लघुशंकेसाठी दुचाकीवरून उतरले. त्याचवेळी ते ज्या निलगिरीच्या झाडाखाली थांबले होते त्या झाडावरच  वीज पडली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

वीज कोसळलेल्या दोन्ही ठिकाणच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.  विजांचा लखलखाट व कडकडाट थरकाप उडवणारा होता. कुडाळ, सोनगाव भिवडी,  बेलावडे, सर्जापूर,  सरताळे,  परीसरात पावसाच्या सरी कोसळल्या. करहर, परिसरात व जावलीच्या  डोंगरी भागातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान, सातार्‍यात सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटात, जोरदार वार्‍यासह पावसाच्या सरी कोसळल्या. रविवार  बाजाराचा दिवस असल्याने मंडई परिसरातील व्यापार्‍यांची ताराबंळ उडाली तर अनेक व्यापार्‍यांचा माल पावसामुळे भिजला.

दहिवडी : माण तालुक्यातील काही गावात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांची धांदल उडाली. ढगांचा गडगडाट व विजेच्या लखलखाटांसह दहिवडीत सुमारे एक तास मुसळधार पाऊस पडला. गेले चार दिवस वाढलेल्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. काल हुलकावणी दिलेल्या पावसाने आज दहिवडीत सुमारे एक तास जोरदार हजेरी लावली. वडगावमध्येही गारांसह जोरदार पाऊस झाला.तालुक्यातील अन्य काही गावात पावसाने हजेरी लावली आहे.