Sun, Dec 08, 2019 18:00होमपेज › Satara › सातारा, वाई, महाबळेश्वरमध्ये धुवाँधार

सातारा, वाई, महाबळेश्वरमध्ये धुवाँधार

Published On: Jul 22 2019 2:01AM | Last Updated: Jul 22 2019 2:01AM
सातारा : प्रतिनिधी

चार दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी सायंकाळी सातार्‍यासह वाई, महाबळेश्वर तालुक्यातही दाणादाण उडवली. अचानक आलेल्या पावसाने व्यापार्‍यांसह नागरिकांनी दैना झाली. काही क्षणात पाणीच पाणी झाले. वळवासारख्या आलेल्या या पावसाने सखल भागात पाणी साचून रस्ते, नाले जलमय  होऊन गेले. दरम्यान, या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांनी आक्राळ विक्राळ स्वरूप घेतले असून, अपघातांना निमंत्रण मिळू लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिमेकडे पावसाने समाधानकारक हजेरी लावली होती. सातारा, वाई, महाबळेश्वर, जावली, पाटण, कराड या तालुक्यात उपयुक्त पाऊस झाल्यानंतर मशागत व पेरण्यांची कामे वेगवान झाली. मात्र, गेल्या 5-6 दिवसांपासून कडक ऊन पडू लागले आहे. 

परिणामी शेतकरी धास्तावला. रविवारी सायंकाळी सातारा शहर व परिसरात मात्र दिलासादायक चित्र निर्माण झाले. अचानक आभाळ काळवंडून गेले. दुपारपासून ढगाळ वातावरण झाले होते. मात्र, वारंवार हवामानात बदल होत असल्याने आजही पाऊस हुलकावणी देणार असे वाटत असताना सायंकाळी 5 च्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. 

अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची आणि व्यापार्‍यांची अक्षरश: दाणादाण उडाली. रविवार बाजाराचा दिवस असल्याने व्यापार्‍यांचे साहित्य, भाजी पाला व इतर साहित्य भिजले असल्याने आर्थिक नुकसान झाले. तर या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांचे अक्षरशः डबके  झाले. खड्ड्यांनी पुन्हा तोंड वर काढल्याने अपघातही झाले. 

महाबळेश्वरलाही झोडपले

महाबळेश्वर शहर व परिसरात शनिवारप्रमाणेच रविवारीही पावसाने धुवाँधार बॅटिंग केली. गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा पडल्याने नागरिकांना हायसे वाटले. गेले काही दिवस ऊन पावसाचा खेळ शहर व परिसरात सुरु असून महाबळेश्वरकरांना ऐन जुलै महिन्यात कधी नव्हे ते सूर्यदर्शन होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, शनिवारी दुपारी व रविवारीही चारनंतर धुवाँधार पावसाचे आगमन झाल्याने वातावरण थंड झाले. पर्यटनास आलेल्या पर्यटकांनी येथिल लिंगमळा धबधब्यावर चांगलीच गर्दी केली होती. वेण्णा लेकवरदेखील असंख्य पर्यटक फेरफटका मारताना दिसले. सायंकाळी बाजारात  पर्यटकांची गर्दी दिसून आली.

दरम्यान, वाई तालुक्यात पावसाच्या चार दिवसाच्या उघडीपीनंतर पुन्हा सलग दुसर्‍या दिवशीही हजेरी लावली. बहुतेक ठिकाणी पावसाच्या उघडीपीनंतर पेरणीची कामे उरकण्यात आली. शेतकर्‍यांना सध्या पावसाची प्रतिक्षा  लागली होती. शनिवारपाठोपाठ रविवारीही पाऊस बरसल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पश्चिम भागात धोम व बलकवडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गतवर्षाच्या तुलनेत पाऊस कमी असल्याने धरणाच्या पाणी पातळीत यावर्षी अपेक्षीत वाढ झाली नाही. दरम्यान महाबळेश्वर येथील पावसामुळे धोम धरणाजवळ डोंगरातून धबधबे वाहू लागले आहेत. धरण क्षेत्रात अद्यापही जादा पावसाची प्रतिक्षा शेतकर्‍यांना आहे.