Wed, Apr 24, 2019 21:35होमपेज › Satara › आरोग्य सुविधाच ‘व्हेंटीलेटरवर’

आरोग्य सुविधाच ‘व्हेंटीलेटरवर’

Published On: Apr 07 2018 1:37AM | Last Updated: Apr 06 2018 10:01PMढेबेवाडी : विठ्ठल चव्हाण

अपूर्ण वैद्यकीय सोयी - सुविधा, रेबीज, संर्पदंश यासारख्या घटनांवेळी औषध उपलब्ध होण्याबाबतची अनिश्‍चितता, रूग्णवाहिकेसाठी चालक नसणे...लॅब टेक्निशियन, सफाई कामगार, शिपाई यांच्यासह वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे यामुळे ढेबेवाडीसारख्या ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा व्हेंटीलेटरवर असल्याचेच पदोपदी दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

सात एप्रिल  हा दिवस  जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्‍वभूमीवर ढेबेवाडी विभागाचा आरोग्य सेवेचा विशेषतः शासकीय आरोग्य सेवेचा आढावा घेतला असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ढेबेवाडी विभागात सळवे, सणबूर, तळमावले, काळगाव याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. कुंभारगांव व ढेबेवाडी येथे ग्रामीण रूग्णालय आहे. मात्र या ठिकाणच्या सोयी - सुविधा समाधानकारक आहेत, असे कधीच पहावयास मिळत नाही. त्यामुळेच या ठिकाणची रूग्णांची संख्या पाहता तळमावले, ढेबेवाडीसह अन्य खासगी वैद्यकीय व्यवसायिकांची रूग्णालये मात्र खचाखच भरलेली पहावयास मिळतात. त्या तुलनेत मोफत असूनही प्राथमिक आरोग्य केंद्रासह शासकीय दवाखान्यात मात्र नेमके याउलट चित्र असते. 

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत सतत उलटसुलट चर्चा ऐकायला मिळतात. रेबीज, सर्पदंश यासह अन्य काही लसी, औषधे वेळेत उपलब्ध होतीलच याची खात्री नसते. खरेतर प्राथमिक आरोग्य केंद्रे असो वा ग्रामीण रूग्णालय असो, तिथे मोफत औषधोपचराची सोय उपलब्ध असते. तरीहीरूग्णांची संख्या रोडावलेली का असते? या प्रश्‍नाचे उत्तर सध्यस्थितीत कोणाकडेच नाही.ढेबेवाडी ग्रामीण रूग्णालय म्हणजे ‘नाव मोठे अन् ...’ असा प्रकार आहे. हे रूग्णालय सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. नेमणूक झालेले वैद्यकीय अधिकारी, तिथे हजर होतीलच याची खात्री नसते. ढेबेवाडीतील ग्रामीण रूग्णालय वैद्यकीय अधिकार्‍यांची अपुरी संख्या आणि अपुरे कर्मचारी, अपूर्ण सेवा सुविधा ही परंपरा आजही कायम आहे.  ग्रामीण रूग्णालयाचे गेल्या महिन्यात मोठ्या थाटामाटात उद्घाटन झाले. त्यावेळी 25 खाटा होत्या, पण दुसर्‍या दिवशी त्यातील काही गायब होत्या. त्यावेळी त्या केवळ देखाव्यासाठी भाड्याने आणल्या होत्या, असे समजले होते.रूग्णालयाकडे रूग्णवाहिका आहे, पण ती चालवायला ड्रायव्हरच नाही.लँब टेक्निशियन नाही, फार्मासिस्ट नाही, मंजूर कक्ष अधिकार्‍यांपैकी तीन कमी आहेत, सफाई कामगार नाहीत, शिपाई नाही अशा एक ना अनेक समस्यांचे माहेरघरच बनले आहे. 

Tags : Satara, Health, care, Ventilator