Sat, Aug 24, 2019 23:38होमपेज › Satara › मुख्याध्यापकाला सर्किट हाऊसमध्ये बेदम मारहाण

मुख्याध्यापकाला सर्किट हाऊसमध्ये बेदम मारहाण

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 18 2018 12:26AMसातारा : प्रतिनिधी

सातारा  शासकीय विश्रागृहामध्ये अमोल एकनाथ  कोळेकर (रा. कोंडवे) या मुख्याध्यापकाला भाजपचे सुनील कोळेकर व शिवसेनेचे पदाधिकारी हरिदास जगदाळे यांच्यासह चौघांनी चप्पलने मारहाण करत एक प्रकरण मिटवण्यासाठी 5 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून या प्रकारामुळे सातार्‍यात विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संदीप मेळाट (रा. दिव्यनगरी), सुनील कोळेकर, हरिदास जगदाळे व अनोळखी एक अशा चौैघांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांमधील सुनील कोळेकर, संदीप मेळाट हे दोघे भाजप तर हरिदास जगदाळे हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. दरम्यान, याप्रकरणी अमोल एकनाथ कोळेकर (वय 37, सध्या रा.कोंडवे ता. सातारा मूळ रा.झरे ता.आटपाडी जि.सांगली) यांनी तक्रार दिली असून ते स्वत: रयत शिक्षण संस्थेच्या रा.ब. काळे जीवन शिक्षण मंदिर मंगळवार पेठ, सातारा या शाळेचे मुख्याध्यापक आहेत.

याबाबत पोलिसांनी माहिती दिल्यानुसार दि. 16 रोजी दुपारी बारा वाजता तक्रारदार अमोल कोळेकर यांना ‘मी, हरिदास जगदाळे बोलतोय, तुम्ही लगेच सर्किट हाऊसला या. आला नाही तर भारी पडेल,’ असा फोन आला.  एक वाजण्याच्या सुमारास तक्रारदार अमोल कोळेकर हे एका सहकार्‍याला घेऊन सर्किट हाऊस येथे गेले. त्यावेळी संशयितांनी 9 नंबरच्या खोलीत येण्यास सांगितले. 9 नंबरच्या खोलीमध्ये ते गेल्यानंतर संशयितांनी कोळेकर यांच्यासोबत आलेल्या सहकार्‍याला तेथून बाहेर जाण्यास सांगितले व  आतून कडी लावून घेऊन तक्रारदार अमोल कोळेकर यांना कोंडले. यावेळी संशयितांनी लाथा, बुक्क्यांनी तसेच चप्पलने मारहाण करत दमदाटी व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

अमोल कोळेकर  यांनी मारहाणीचे कारण विचारल्यानंतर एक प्रकरण मिटवण्यासाठी त्यांना 5 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास बदनामी करणार असल्याचे सांगून घरावर व शाळेवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला. तसेच संशयितांनी स्वत:कडे रिव्हॉल्व्हर, तलवार असल्याचे सांगून खून करण्याची धमकीही दिली. ही सर्व घटना बुधवारी दुपारी 1 ते 4 या कालावधीत सर्किट हाऊस येथे घडली. दरम्यान, सायंकाळी चारनंतर सर्व संशयित तेथेच तक्रारदार यांना सोडून निघून गेले.

यानंतर तक्रारदार अमोल कोळेकर यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी बुधवारी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी रात्री उशीरा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सपोनि श्रीकृष्ण पोरे करत आहेत. दरम्यान, भाजप- सेना पदाधिकार्‍याकडून मुख्याध्यापकाला थेट मारहाण करत खंडणीची मागणी झाल्याने सातारामध्ये खळबळ उडाली आहे.

Tags : satara news, circuit house, Headgear, beat ,