Sun, May 26, 2019 18:41होमपेज › Satara › दहा वर्षांच्या हर्षदने वाचवले बुडणार्‍या विद्यार्थ्याचे प्राण

दहा वर्षांच्या हर्षदने वाचवले बुडणार्‍या विद्यार्थ्याचे प्राण

Published On: Mar 18 2018 1:05AM | Last Updated: Mar 17 2018 11:14PMलिंब : वार्ताहर

गोवे (ता. सातारा) येथील कोटेश्‍वर मंदिर परिसरात कृष्णा नदीत बुडणार्‍या चौथीतील शिवम शिंदे या मुलाला पाचवीतील हर्षद जगताप याने आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवले. अवघ्या 10 वर्षांच्या हर्षदचे प्रसंगावधान व त्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक व्यक्‍त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोवे येथील शुभम राजेंद्र शिंदे, राजेश लोहार, हर्षल हणमंत जगताप ही मुुले पोहण्यासाठी कृष्णा नदीतील कोटेश्‍वर मंदिरासमोरील कुंडामध्ये गेली होते. यादरम्यान शुभम हा दोघांनाही सोडून पुलालगतच्या डोहात पोहण्यासाठी गेला.

पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम बुडाला. यावेळी सोबत असणार्‍या हर्षद आणि राजेश यांना तो बुडत असल्याचे दिसून आले. हर्षदने क्षणाचाही विचार न करता डोहात उडी मारली. शुभम यावेळी गटांगळ्या खात अचानक पाण्यात दिसेनासा झाला. तेव्हा हर्षद याने पाण्यात सूर मारुन शुभमचा शोध घेतला. जिवाची पर्वा न करता त्याने शुभमला पाण्याबाहेर काढून प्राण वाचवले. ही घटना शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. 

शुभमच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे तो बेशुध्द पडला होता. यावेळी हर्षद व राजेश यांनी त्याला झोपवून पोटातील पाणी बाहेर काढले व शुध्दीवर आणले. हर्षदच्या या धाडसाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शनिवारी सकाळी कोटेश्‍वर विद्यालयात हर्षद याचा शाळा समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.

सध्या शाळा सकाळच्या भरत असल्यामुळे मुले दुपारच्या सुमारास नदीकडे पोहण्याकडे जात असतात. याकडे पालकांचे दुर्लंक्ष होत असून अशा घटना रोखण्यासाठी त्यांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्‍त होत आहे.

 

Tags : satara, satara news, student, drowning, Harshad, saved life,