Wed, Jul 17, 2019 18:12होमपेज › Satara › सात बारा संगणकीकरणाचे काम क्रांतिकारी

सात बारा संगणकीकरणाचे काम क्रांतिकारी

Published On: May 03 2018 1:32AM | Last Updated: May 02 2018 11:34PMसातारा : प्रतिनिधी

डिजिटल स्वाक्षरीसह संगणकीकृत सात-बारा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील तीन तालुके संपूर्ण डिजिटल झाले असून उरलेल्या तालुक्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महिन्यात संपूर्ण जिल्हा संगणकीकृत सातबारायुक्‍त होईल. सातारा महसूल प्रशासनाचे हे काम क्रांतिकारी आहे, असे गौरवोद‍्गार जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे  यांनी काढले. दरम्यान, सातबारा संगणकीकरणात कोरेगाव व महाबळेश्‍वर या तालुक्यांनी बाजी मारली.

डिजीटल स्वाक्षरीचा सातबारा वितरण समारंभ पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडला. त्यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख,  कीर्ती नलावडे, अस्मिता मोरे, दादासाहेब कांबळे, संतोष जाधव, हिंमत खराडे, श्रीरंग तांबे तसेच  तहसीलदार  उपस्थित होते.

ना. विजय शिवतारे म्हणाले, शेतकर्‍यांचा सातबारा संगणकीकृत करणे हा राज्य शासनाचा महत्वाचा उपक्रम असून त्यामध्ये सातारा जिल्ह्याने चांगले काम केले. सातबार्‍यावर त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत असतो. जिल्ह्यात 91 मंडल कार्यालये असून या कार्यालयांसाठी सुसज्ज अशी इमारत व इतर सुविधा असणे गरजेचे आहे, त्यासाठी प्रस्ताव सादर करावा. यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. 

ना. शिवतारे यांनी सातबारा संगणकीकरणाचे काम 100 टक्के पूर्ण केलेल्या कोरेगाव, महाबळेश्वर, खंडाळा या तालुक्यांचे अभिनंदन केले.  इतर तालुक्यांनी एका महिन्यात उर्वरित काम पूर्ण करावे. शेतकर्‍यांना मित्र वाटावा, अशा पद्धतीने तलाठ्यांनी काम करावे, असेही ना. शिवतारे यांनी बजावले. 

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल म्हणाल्या, संगणकीय सातबारा हा उपक्रम 2008 पासून सुरु करण्यात आला. सध्या  1250 गावांचे संगणकीय सातबारा उपलब्ध करुन देत आहोत. ई-फेरफार, ई- अभिलेख, ई-नोंदणी यांचेही काम सुरु आहे. जिल्ह्यातील 14 लाखांच्यावर संगणकीय सात-बारा ऑनलाईन करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील 480 तलाठी कार्यरत आहेत. इतर तालुक्यांचे कामही महिन्यात  100 टक्के  पूर्ण होईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. 

दरम्यान, मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या डिजीटल स्वाक्षरीसह संगणकीकृत सातबारा लोकार्पण सोहळ्याच्या  मुख्य कार्यक्रमाचे   थेट प्रक्षेपणही   उपस्थितांना दाखवण्यात आले. कोरेगाव प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, तहसीलदार विवेक जाधव,  नायब तहसीलदार रवींद्र रांजणे यांनीही  मनोगत व्यक्त केले. दरम्यान, डिजीटल स्वाक्षरी सातबारा या उपक्रमात उत्कृष्ट काम करणार्‍या प्रांत, तहसीलदार, मंडल अधिकारी तसेच तलाठ्यांचा सत्कार पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांनी केला.  कार्यक्रमास महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.