Wed, Apr 24, 2019 15:30होमपेज › Satara › समाज कंटक घुसल्यानेच दगडफेक : पालकमंत्री

समाज कंटक घुसल्यानेच दगडफेक : पालकमंत्री

Published On: Jul 26 2018 1:39AM | Last Updated: Jul 25 2018 10:54PMसातारा : प्रतिनिधी

राज्यातील मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त असली तरी आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे राज्य सरकार काहीही करु शकत नाही. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार सकारात्मक आहे. जिल्ह्यातील सकल मराठा समाजातर्फे सुरु असलेल्या आंदोलनावेळी काही बाहेरच्या  समाजकंटकांनी गैरसमज पसरवण्यासाठी दगडफेक केली. त्या घटनेचे व्हिडीओ शुटिंग, सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चावेळी गडबड झाली, फायरिंग झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. बॉम्बे रेस्टॉरंट चौकात जिल्हा पोलिस अधीक्षक, अतिरिक्‍त जिल्हा पोलिस अधीक्षक व काही पोलिस अधिकारी तसेच या मराठा क्रांती  मोर्चातील पदाधिकार्‍यांनी यावेळी महत्वाची भूमिका बजावली. मोर्चातील मुख्य लीडर भेटल्यावर काही गोष्टी लक्षात आल्या.  जिल्ह्यातील पोलिस दलाने मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर खूप चांगले काम केले. अनियंत्रित जमाव झाला त्यावेळी मोर्चातील पदाधिकार्‍यांनी चांगल्यापध्दतीने परिस्थिती हाताळली.  त्यामुळे पुढील अनर्थ टळले. मोर्चाचा  समारोप झाल्यावर सर्वजण शांततेत आपापल्या मार्गाने जात असल्याचे दिसत असताना या मोर्चाशी संबंध नसलेल्या काहींनी अचानक दगडफेक करायला सुरुवात केली. त्यामुळे समज-अपसमजातून काही गोष्टी घडल्या. एसपी संदीप पाटील तसेच अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक विजय पवार  हे जागेवरच हजर होते. मोर्चातील पदाधिकार्‍यांनीही अनियंत्रित झालेल्या जमावावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्याने भविष्यातील हानी टळली.  चुकीच्या गोष्टी करु नका, थांबा असे मोर्चाचे लीडरच सांगत असताना कुठेतरी गडबड झाली. ज्या काही गडबडी केल्या त्या अँटी सोशल घटकांनी केल्या. त्यामुळे सीसीटीव्हीचे फुटेज, व्हिडिओ शुटिंग याद्वारे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत की नाहीत, याची शहानिशा होवून कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाईल. 

समाज चांगले काम करत असताना नाहक बदनामी होवू नये, असे संयोजकांचे मत आहे. दगडफेकीमध्ये पत्रकारांबरोबरच जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही इजा झाली. मोर्चातील नेत्यांनी ताबडतोब लक्ष घातल्याने पुढील अनर्थ टळला, असेही ना. शिवतारे म्हणाले. 

जिल्हा पोलिस दलाच्या कामगिरीबाबत  ना. विजय शिवतारे  यांना विचारले असता ते म्हणाले, पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली.  तुफान दगडफेक होत असताना एसपींनी  संयम सोडला नाही. दगड लागतात त्यावेळी पोलिस कर्मचारी बिथरतात. तेही अनियंत्रित होतात. अशावेळी एसपी तसेच अ‍ॅडिशनल एसपींनी सर्वच बाबतीत कौतुकास्पद व संयमाने काम केले. घरातला पालक जी भूमिका घेतो, संयम दाखवतो तिच भूमिका पोलिसदलाने आजच्या घटनेवेळी घेतली. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाची  मी प्रशंसा करतो. त्याचबरोबर मोर्चातील संयोजक हे  प्रक्षुब्ध जमाव पाहून बाजूला झाले नाहीत, तर ते पोलिसांबरोबर राहिले.  त्यांनी मोर्चातील लोकांना चुकीचे कृत्य करण्यापासून रोखले. त्यामुळे गैरसमज जो पसरवला गेला असता ते झाले नाही. लीडरच प्रक्षुब्ध जमावाला थांबण्याचे आवाहन करत होते. त्यामुळेच पुढील अनर्थ टळल्याचे पालकमंत्री म्हणाले.