Tue, Jan 22, 2019 11:39होमपेज › Satara › चिमुकल्यांचा चिमण्या जीवांसाठी चारा, पाणी 

चिमुकल्यांचा चिमण्या जीवांसाठी चारा, पाणी 

Published On: Apr 30 2018 1:48AM | Last Updated: Apr 27 2018 8:11PMकराड : प्रतिनिधी 

उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून जर मानव गर्मीने एवढे हैराण होत असतील तर पक्षी, प्राण्यांचे काय? त्यातच दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असल्याने प्राण्यांची अक्षरश: तडफड होत आहे. पाण्यासाठी पक्षी भटकत असताना दिसून येत आहेत. यासाठी काही ठिकाणी चिमुकल्यांनी या चिमण्या जीवांसाठी पाण्याचे असे नियोजन केले आहे. घराशेजारी पाणी ठेवल्याने पक्षांना गारवाही मिळत आहे व तहानही भागत आहे. 

जर तुम्ही ग्रामीण भागात राहात असाल तर तुमच्या अंगणात असणार्‍या झाडांवर चिमणी, कावळा आदी छोटेे प्राणी इकडून तिकडून पंख फडकवून फिरत असतील. तर त्यांच्यासाठी अंगणात पाणी पिण्यासाठी प्लॉस्टिकचा पाण्याचा मग ठेवा. (नवीन मग आणण्याची गरज नाही, वापरात असलेले जुने मग चालतील) त्यांच्यासाठी घरातील  थोडे धान्यही टाकून ठेवा. जर शहरी भागात राहात असाल तर गच्चीवर चिमणपाखरांसाठी हेच सर्व काही करा. बाहेर फिरायला गेल्यावर पक्षी, प्राणी दिसलेच तर त्यांना खाऊ घालायला विसरू नका.

मानवाच्या राहणीमानाच्या बदलत्या संकल्पनेमुळे पक्षांची संख्या कमी होऊ लागली आहे. पक्षांमध्ये वाढ होण्यासाठी एवढी मदतही पुरेशी ठरेल.पक्षांना यामुळे दिलासा मिळेल, पक्षांच्या जीवाची तगमग थांबेल आणि आणि आपल्याही मनाला काहीतरी, कोणासाठी तरी करू शकलो याचा आनंद मिळेल. घराच्या चारही बाजूने पाणी भरून छोट्या वाट्या, प्लॉस्टिकच्या बॉटल कापून अथवा प्लेटमध्ये पाणी भरून ठेवा. पाण्यासाठी भटकत असलेल्या पक्षाला हा मोठा दिलासा ठरत आहे.  घरात असणार्‍या खेळण्यातील वाट्यांमधून चिमुकले पाणी भरून ठेवत आहेत.त्यामुळे अंगणात चिमण्यांची चिवचिवही राहील.