Thu, Jul 18, 2019 04:07होमपेज › Satara › जिल्ह्यातील भूजल पातळी यंदा समाधानकारक

जिल्ह्यातील भूजल पातळी यंदा समाधानकारक

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 8:27PMसातारा : प्रतिनिधी

भूजल सर्वेक्षण विभागामार्फत  सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 106 विहिरींची भूजल सर्वेक्षण विभागामार्फत  तपासणी करण्यात आली असून 84 विहिरीतील भूजल पातळी गतवर्षीच्या तुलनेत अधिक असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सर्वच तालुक्यात भूजल पातळी समाधानकारक असल्याने यंदा पाणी टंचाईचे संकट कमी प्रमाणात जाणवत आहे.

सातारा जिल्ह्यात सिमेंट नालाबांध, पाझर तलाव, जलयुक्त शिवार योजना यासारखे विविध प्रकल्प दुष्काळी तालुक्यासह जिल्ह्यात राबवण्यात आले असल्याने अनेक ठिकाणी हंगाम काळात झालेल्या पावसाचे पाणी साठले आहे. जलसंधारणाच्या झालेल्या कामामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अडले गेले. त्याचा परिणाम ते पाणी भूगर्भात झिरपण्यास मदत झाली. त्यामुळे भूजल पातळीत जिल्ह्यातील  सर्वच तालुक्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.

भूजल सर्वेक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील 11 तालुक्यातील सुमारे 106 विहिरींचे नुकतेच निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये सर्वच तालुक्यातील भूजल पातळी गतवर्षी मार्च महिन्यातील पातळीच्या तुलनेत अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील 5 वर्षाच्या मार्चमधील विहिरींच्या पाणी पातळीचा सरासरी विचार करता सर्वच तालुक्यातील पाणी पातळी यंदा समाधानकारक  झाली आहे. विशेषत: दुष्काळी माण व खटाव तालुक्यात यंदा एक मीटरपेक्षा  जास्त पाणी पातळी टिकून आहे.

जावलीत एका विहिरीचे निरीक्षण केले असून त्यामध्ये गतवर्षी मार्चमधील  भूजल पातळीच्या तुलनेत यंदाची पातळी अधिक आहे. अन्य तालुक्यातही अशीच समाधानकारक पातळी आहे. कराड तालुक्यातील 15 पैकी 11, खंडाळ्यातील 5, खटावमधील 17, कोरेगावमधील 9, माणमधील 16 पैकी 13, महाबळेश्‍वरमधील 3, पाटणमधील 10 पैकी 6, फलटणमधील 12 पैकी 7, सातारा 10 पैकी 6, वाई 8 पैकी 6 अशा मिळून 84 विहिरींची पाणी पातळी गतवर्षीपेक्षा अधिक आहे.  तर 22 विहिरींची पाणीपातळी खालावली आहे.

खटाव तालुक्यात 1.63 मीटर, कोरेगाव 1.21 मीटर, माण 1.33  मीटर,  वाई 1.12 मीटर, खंडाळा 1.39 मीटर, महाबळेश्‍वर 0.33 मीटर, पाटण 0.14 मीटर, फलटण 0.40 मीटर, सातारा 0.21 मीटर, जावली 0.64 मीटर व कराड तालुक्यात 0.34 मीटरने पाणी पातळी गतवर्षीच्या तुलनेत अधिक  असल्याची माहिती भुजल सर्वेक्षण विभागामार्फत देण्यात आली.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक  गावात एक निरीक्षण विहीर निश्‍चित करण्यात आली आहे. याबाबत संबंधित गावातील जलसुरक्षक, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना पाणी पातळी घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. पाणी पातळीच्या  नोंदी ठेवण्यासाठी  नोंदवही, मार्गदर्शक पुस्तिका व मोजमाप घेण्यासाठी टेप देण्यात आलेले होते. मात्र, ग्रामपंचायत पातळीवर याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी आहेत.