Wed, Mar 27, 2019 06:33होमपेज › Satara › ग्रंथ महोत्सव म्हणजे संस्कारांचा उत्सव

ग्रंथ महोत्सव म्हणजे संस्कारांचा उत्सव

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 11:13PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सातार्‍याच्या ग्रंथमहोत्सवाला कोणत्याही महोत्सवाची सर येणार नाही. हा संस्कांराचा व ग्रंथाचा महोत्सव असल्याने त्याचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेला आहे, असे गौरवोद‍्गार राज्याच्या प्रौढ शिक्षण विभागाचे संचालक दिनकर पाटील यांनी काढले.

जि. प. मैदानावरील विंदा करंदीकर नगरीमध्ये सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने आयोजित केलेल्या ग्रंथमहोत्सव 2018 च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विजय कुवळेकर व ग्रंथमहोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, ग्रंथमहोत्सवाची सवय मुलांना, पालकांना व शिक्षकांना झाली आहे. या ग्रंथमहोत्सवाची साहित्य संस्कृती मंडळ व राष्ट्रीय शिक्षा अभियानाने घेतली आहे. त्यामुळे सातार्‍याचा ग्रंथमहोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला आहे. विद्यार्थ्यावर वाचनांचा संस्कार अतिशय महत्वाचा आहे. वाचनाचे व संस्कारांचे महत्व ग्रंथमहोत्सवामधून पहावयास मिळत असते. विद्यार्थ्यांना मोबाईल घेवून देवून दर महिन्याला 200 रुपयांचे रिचार्ज मारण्यापेक्षा पालकांनी 200 रुपयाची पुस्तके दिली तर त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. 

कुवळेकर म्हणाले, सातार्‍याचा ग्रंथमहोत्सव महाराष्ट्रात आदर्शवत ठरला आहे. या ग्रंथमहोत्सवातून ज्ञानाच्या, विचारांची शिदोरी  मिळण्यास मदत झाली आहे. ग्रंथमहोत्सव समाजिक भान देणारा व समाज घडवणारा एक हात आहे. नवा माणूस घडवण्याची प्रक्रिया ग्रंथ आणि साहित्याच्या माध्यमातूनच होऊ शकते. मन घडवण्यासाठी श्रवण, वाचन, चिंतन आवश्यक आहे.

माणसापयर्र्ंत पुस्तके नेण्याचे काम या महोत्सवामधून होत आहे. माणसाचे बाह्यरूपातून त्याचे मोजमाप व मूल्यमापन करू नये. माणसाला माणूस जोडण्याचे काम ग्रंथच करू शकतात. यावेळी शंकर सारडा, प्राचार्य यशवंत पाटणे यांनी मनोगत व्यक्त केले. शिरीष चिटणीस यांनी प्रास्तविक केले. सुनीता कदम यांनी सूत्रसंचलन केले. राजकुमार निकम यांनी आभार मानले.