Wed, Apr 24, 2019 02:14होमपेज › Satara › सातार्‍यात उद्यापासून ग्रंथमहोत्सव

सातार्‍यात उद्यापासून ग्रंथमहोत्सव

Published On: Jan 04 2018 1:04AM | Last Updated: Jan 03 2018 10:31PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने  दि. 5 ते 8 जानेवारी  या  कालावधीत जिल्हा परिषद मैदानावर विंदा करंदीकर नगरीमध्ये  ‘ग्रंथमहोत्सव 2018’ आयोजित केला असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यवाह डॉ. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस , उपाध्यक्ष वि.ना.लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मंगळवार दि. 5 रोजी सकाळी 8.30  गांधी मैदान, राजवाडा येथे ग्रंथ दिंडीचे पूजन विविध  मान्यवरांच्या हस्ते होणार असून 11 वा. ग्रंथमहोत्सवाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक विजय कोळेकर यांच्या हस्ते व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. 

दु. 3 वा. ‘जपूया देणं निसर्गाचं’ कार्यक्रम होणार असून सायं. 7 वा. स्वर निनाद प्रस्तुत ‘बरसात सप्तसुरांची’ हा हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि. 6 रोजी सकाळी 8.30 वा.चला घडूया, 11 वा. संशोधकांच्या सहवासात, दु. 3 ते 5 या वेळेत साहित्य आणि राजकारण अनुगंध या विषयावर परिसंवाद होणार आहे. सायं. 7 वा. खा. उदयनराजे यांच्या हस्ते संभाजी मालिकेतील कलावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.

रविवार दि. 7 रोजी सकाळी 8.30 वा. विद्यार्थ्यांचा आनंददायी सांस्कृतिक कार्यक्रम, दु. 3 वा. ग्रंथमहोत्सवाचा सांगता समारंभ ज्येष्ठ पत्रकार विनय हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली. जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर , उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे व संजय अवटी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सायं.7 वा. गीत रामायणाचा कार्यक्रम होणार आहे.  सोमवार दि. 8 रोजी सकाळी 8.30 वा. कथाकथन, 11 वा. इथे घडतात वाचक वक्ते, दु. 3 वा. कवि संमेलन, सायं. 5.30 वा. कविता करंदीकरांची, गाणी पाडगावकरांची हा कार्यक्रम होणार आहे.

मुंबई, नागपुर, कोल्हापुर व पुणे यासह विविध ठिकाणचे सुमारे 110  पुस्तकांचे स्टॉल सहभागी होणार आहेत.  या ग्रंथमहोत्सवाचा लाभ जास्तीत जास्त वाचक व ग्रंथप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन ग्रंथमहोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.यावेळी डॉ. राजेंद्र माने, प्रा. साहेबराव होळ, प्रदीप कांबळे, प्रल्हाद पारटे, ल.गो.जाधव, शेखर हसबनीस, सुनील बंबाडे व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.