Mon, May 27, 2019 01:28होमपेज › Satara › अपघातात आजी, नात ठार

अपघातात आजी, नात ठार

Published On: Dec 31 2017 1:28AM | Last Updated: Dec 30 2017 10:51PM

बुकमार्क करा
कोडोली : वार्ताहर

सातार्‍यातील देगाव फाटा येथे शनिवारी दुपारी कंटेनर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील  आजी व नात जागीच ठार झाले. अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला आहे. कुसुम दत्तात्रय तोडकर (वय 55, मूळ रा. विश्रामबाग, सांगली) व वैदेही हेमंत तोडकर (वय 9,  रा. चंदनगर, कोडोली, सातारा) असे ठार झालेल्या आजी व नातीचे नाव आहे. या दुर्घटनेत अमोल मधुकर माळी (35)  हेे जखमी झाले आहेत. 

कुसुम तोडकर या दोन दिवसांसाठी सातार्‍यातील मुलीकडे आल्या होत्या. शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अमोल माळी हे सासू कुसुम व नात वैदेही  यांना सोबत घेऊन दुचाकीवरून (एमएच 11 सीके 2372) बसस्टॉपवर निघाले होते. दुचाकी देगाव फाटा येथे आल्यानंतर त्याचवेळी पाठीमागून आलेल्या कंटेनरची (क्र. एमएच 06 एक्यू 2052) दुचाकीला जोराची धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की कुसूम तोडकर या रस्त्यावर फेकल्या गेल्या व जागीच ठार झाल्या.

दरम्यान, अपघातानंतर दुचाकी कंटेनरमध्ये अडकल्याने ती सुमारे 20 फूट फरफटत नेली. यावेळी वैदेही व अमोल गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सायंकाळी चिमुरड्या वैदेहीचा मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता तर दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. यावेळी कंटेनर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. दरम्यान, अपघातामुळे परिसरातील वाहतूक ठप्प झाली. रात्री उशीरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.