Sun, Mar 24, 2019 08:16होमपेज › Satara › ग्रामसेवकांचा मूक मोर्चा

ग्रामसेवकांचा मूक मोर्चा

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 10:01PMसातारा : प्रतिनिधी

ग्रामपंचायतीच्या नियमित कामकाजाव्यतिरिक्त इतर विभागाच्या कामाचा बोजा, अतिरिक्त ताणतणाव, आर्थिक पिळवणूक, मानसिक छळ,  नियमबाह्य कामे यासह विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने बुधवारी  जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कै. एस. बी. वाघ ग्रामसेवक गोंदूर जि. धुळे यांच्यासह गेल्या दोन वर्षात राज्यातील 40 ते 50 ग्रामसेवकांच्या आत्महत्या, शेकडो ग्रामसेवकांचे झालेले अपघात व 1 हजार ते 1 हजार 500  ग्रामसेवकांवर झालेले प्राणघातक हल्ले यामुळे ग्रामसेवक वर्गाचे जीवन बरबाद होत आहे. कै.एस.बी.वाघ यांच्या आत्महत्येची चौकशी सीआयडी विभागामार्फत होण्यासाठी  योग्य ती कार्यवाही करावी.

केंद्र व राज्य शासन, जिल्हा परिषदेच्या विविध योजना, नागरिकांच्या मुलभूत गरजा व दैनंदिन कामकाज करताना वरिष्ठ अधिकारी यांचा अतिरिक्त दबाव, विना चौकशी, विनानोटीस निलंबित करणे, वेतनवाढ बंद करणे, बिनपगारी करणे, वैयक्तीक लाभाच्या योजनांमध्येही स्थानिक राजकारणातून नियमबाह्य लाभार्थी  निवड करावयास भाग पाडणे, मनरेगासारख्या मागणी आधारीत योजना उद्दीष्ट देवून करण्यास  भाग पाडणे यामुळे ग्रामसेवकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छ भारत अभियानअंतर्गत ग्रामसेवक  रात्रंदिवस काम करत आहेत. मात्र, नागरिकांच्या  उदासिनतेमुळे कामे होत नाहीत, असेही निवेदनात म्हटले आहे. 

मूक मोर्चात जिल्हाध्यक्ष दिपकराव दवंडे, जि.प. महासंघाचे अध्यक्ष काका पाटील, राज्य मानद सचिव उद्धव फडतरे, सुरेश बाबर, विजयराव निंबाळकर, नंदकुमार फडतरे, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सहभागी झाले होते.