होमपेज › Satara › लुमणेखोल खासदार गटाकडे तर कोंडवे आमदार गटाकडे 

लुमणेखोल खासदार गटाकडे तर कोंडवे आमदार गटाकडे 

Published On: Mar 01 2018 1:49AM | Last Updated: Feb 28 2018 10:49PMसातारा : प्रतिनिधी

सातारा तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळवले. लुमणेखोल ग्रामपंचायत खा. उदयनराजे भोसले गटाने तर धावडशी ग्रामपंचायत आ. शिवेंद्रराजे गटाने ताब्यात घेतली. पोट निवडणूक झालेल्या कोंडवे, संभाजीनगर, खेड, विलासपूर, खिंडवाडी, शेळकेवाडी  आदी ग्रामपंचायतींवरही दोन्ही  राजे गटांचाच वरचष्मा राहिला.

सातारा तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले होते. ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मोजणी सातार्‍यातील भूविकास बँकेच्या सभागृहात सकाळी 10 वाजता निवडणूक निरीक्षक तथा प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख  तसेच निवडणूक नियंत्रक अधिकारी तथा सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली. दोन तासांतच निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. सार्वत्रिक निवडणूक झालेल्या धावडशीमध्ये आ. गटाने वर्चस्व मिळवले. सरपंचपदासाठी झालेल्या लढतीत मंदाकिनी पवार यांनी मोहिनी चोरगे यांचा पराभव केला. पवार यांना  741 तर चोरगे यांना 687 मते मिळाली.

प्रभाग क्र. 1 मध्ये  शांताराम मस्के यांनी चंद्रकांत मस्के यांचा 30 मतांनी पराभव केला. शांताराम मस्के यांना 237 मते मिळाली. रुपाली ढेंबे यांनी वंदना चव्हाण यांचा 63 मतांनी  पराभव केला. ढेंबे यांना 254  मते मिळाली. दैवता शेळके यांनी जयश्री पवार यांचा 32 मतांनी  पराभव केला. शेळके यांना 238 मते मिळाली.

प्रभाग क्र. 2 मध्ये दिलीप पवार यांनी रमेश पवार यांचा 103 मतांनी पराभव केला. दिलीप पवार यांना 261 मते मिळाली. प्रभाग क्र. 3 मध्ये अंजना पवार, वंदना अनपट यांचा पुष्पा पवार  व  कोमल पवार  यांनी पराभव केला.  किसन लोहार यांनी  विजयकांत जंगम यांचा पराभव केला. लोहार यांना 282 मते मिळाली. हिरालाल पवार यांनी नंदकुमार पवार यांचा 38 मतांनी पराभव केला. हिरालाल पवार यांना 263 मते मिळाली.

लुमणेखोल ग्रामपंचायतीवर खा. उदयनराजे गटाने वर्चस्व मिळवले. सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत कोमल भंडारे यांनी रोहिदास भंडारे यांचा 102 मतांनी पराभव केला. कोमल भंडारे यांना  156 मते मिळाली.किसन चिकणे यांनी संतोष भंडारे यांचा 49  मतांनी पराभव केला. चिकणे यांना 62 मते मिळाली.संपत माने यांनी जानू माने यांचा 48 मतांनी पराभव केला. संपत माने यांना 61 मते मिळाली. प्रभाग क्र. 3 मध्ये शालन घोरपडे व शकुंतला भंडारे यांचा कमल माने कलाबाई माने यांचा पराभव केला. दोन्ही मानेंना प्रत्येकी 37 तर भंडारे व घोरपडे यांना प्रत्येकी 27 मते मिळाली. पॅनेल टू पॅनेल मतदान झाल्याने याठिकाणी चुरस पहायला मिळाली. या ग्रामपंचायतीच्या दोन जागा बिनविरोध तर एक जागा रिक्‍त राहिली.

सातारा तालुक्यातील 8 ग्रामपांयतींच्या रिक्‍त जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये सातारा पं.स. सभापती मिलिंंद कदम यांनी खेडची जागा निवडून आणली. त्याठिकाणी राष्ट्रवादीचे राजेंद्र सोनटक्के विजयी झाले. पं.स.सदस्य आशुतोष चव्हाण यांनी विलासपूर ग्रामपंचायतीची जागा निवडून आणली. त्याठिकाणी राष्ट्रवादीचे वैभव भोईटे विजयी झाले.
संभाजीनगर ग्रामपंचायतीत चुरशीने निवडणूक झाली.  साविआतील अंतर्गत गटबाजीचा एका गटाला फटका बसला तर दुसरा गट निवडून आला. साविआच्या अलका कुंजीर विजयी झाल्या. शेळकेवाडीत आ. शिवेेंद्रराजे गटाचे संतोष शेळके यांनी बाजी मारली. फत्यापूरमध्ये कमळ फुलले. त्याठिकाणी भाजपचे मनोजदादा घोरपडे यांनी शिवसेनेकडील जागा खेचून आणली. त्याठिकाणी भाजपचे अधिक घाडगे विजयी झाले.  

कोंडवे ग्रामपंचायतीच्या रिक्‍त जागेसाठी खा. उदयनराजे गटाचे बाळासाहेब चोरगे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलेल्या मंगल गाडे विजयी झाल्या. खिंडवाडी ग्रामपंचायतीच्या रिक्‍त जागेवर सुरेखा कदम तर, सासपडे ग्रामपंचायतीच्या रिक्‍त जागेवर  लताबाई पवार निवडून आल्या. निवडणूक मतमोजणीवेळी महसूल निवासी नायब तहसीलदार जयंत वीर, निवडणूक नायब तहसीलदार ए. आय. सय्यद, नितीन घोरपडे, विलास शितोळे यांनी परिश्रम घेतले.