कराड : प्रतिनिधी
कराड तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व 4 ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीचे निकाल बुधवारी जाहीर झाले. यामध्ये रेठरे बु. येथे भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ.अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील कृष्णा विकास आघाडीने सलग चौथ्यावेळी ग्राम पंचायतीची सत्ता कायम राखली. या आघाडीचे सरपंच पदाच्या उमेदवारांसह सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. दरम्यान टेभू, येवती, हेळगाव येथे सत्तापरिवर्तन घडले. दरम्यान कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
तालुक्यातील 13 ग्रामपंचायती पैकी 6 बिनविरोध झाल्या होत्या. 7 ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. यामध्ये रेठरे बु, हेळगाव, पिंपरी, टेंभू, येणपे, शेळकेवाडी (येवती) आणि येवती यांचा समावेश होता. तर 49 पैकी 4 ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये नडशी, तांबवे, कोरीवळे व चिखली या ग्रामपंचायतींचा समावेश होता.
टेंभू येथे सत्तांतर
टेंभू येथे चुरशीचा दुरंगी सामना झाला. बबु्रवाहन पाटील यांच्या नेतृत्वाखालील जोतिर्लिंग पॅनेल विरोधात निवास जाधव यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनेल यांच्यात लढत झाली. यामध्ये विरोधी ग्रामविकास पॅनेलने बाजी मारत सरपंच पदासह एकतर्फी विजय मिळवला. दहा वर्षानंतर येथे सत्तांतर झाले आहे.
जोतिर्लिंग पॅनेल ग्रामपंचायतीची सत्ता कायम राखणार, असे वातावरण असताना मोठ्या चतुराईने विरोधी ग्रामविकास पॅनेलने ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली. निवास जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम कामी आले. सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी असल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती.
ग्रामविकास पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार युवराज भिमराव भोईटे विजयी झाले. त्यांना 992 मते मिळाली. तर सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार सचिन पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना 796 मते मिळाली. सरपंच पदासह ग्रामविकास पॅनेलचे सर्व 9 सदस्य विजयी झाले.
रेठरे बु. येथे एकतर्फी विजय
रेठरे बु. ग्रामपंचायत निवडणुकीकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी कृष्णा विकास आघाडी तर विरोधात कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील कै. पै. मारूतीरावजी कापूरकर ग्राम विकास पॅनेलमध्ये दुरंगी लढत झाली. सुरूवातीपासूनच ही निवडणूक एकतर्फी होईल, अशी अटकळ बांधली गेली होती. निकालानंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले.
अपेक्षेप्रमाणे येथे डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील कृष्णा विकास आघाडीने एकतर्फी दणदणीत विजय मिळवत विरोधी पॅनेलला सलग चौथ्यांदा चारीमुंड्या चीत केले.
या पॅनेलच्या सरपंच पदाच्या उमेदवार सुवर्णा कृष्णत कापूरकर यांना 5 हजार 535 येवढी मते मिळाली. तर विरोधी पॅनेलच्या उमेदवार अरूणा विनायक धर्मे यांना 1 हजार 782 मते मिळाली. जवळजवळ 3 हजार 753 येवढ्या मोठ्या मताधिक्याने कृष्णा विकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार विजयी झाल्या. शिवाय या आघाडीचे सदस्य पदाचे उमेदवारही मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. सरपंच पदासह 18/0 असा कौल मतदारांनी दिला आहे.
येवती येथे सत्ता परिवर्तन
येवती येथे सत्ता परिवर्तन झाले. सरपंच पद सर्वसाधारण जागेसाठी होते. सरपंच पदासाठी चौरंगी लढत झाली. सत्ताधारी गटाचे रयत ग्रामविकास पॅनेल विरोधात श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल व शिवभीम ग्रामविकास पॅनेल यांच्यात लढत झाली.यामध्ये श्री भैरवनाथ पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार सागर शिवाजी शेवाळे विजयी झाले. दोन सदस्यही या पॅनेलचे निवडून आले. दोन वॉर्ड यापूर्वी बिनविरोध झाले होते.
माजी सरपंच शिवाजी शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली श्री भैरवनाथ पॅनेल लढले. शेवाळे हे विलासराव पाटील उंडाळकर यांचे कट्टर समर्थक आहेत. माजी पं.स.सदस्य सदाभाऊ शेवाळे यांच्या गटाची सत्ता गेली.
शेळकेवाडी (येवती) सत्ता कायम
शेळकेवाडी येथे दुरंगी लढत झाली. सत्ताधारी गटाचे रयत ग्रामविकास पॅनेल विरोधात श्री म्हसोबा ग्रामविकास पॅनेल यांच्यात पाच जागेसाठी निवडणूक झाली. सरपंच ओबीसीसाठी आरक्षित असल्याने ते रिक्त राहिले. यामध्ये विद्यमान सरपंच अधिकराव ज्ञानदेव शेळके यांच्या नेतृत्वाखाली रयत ग्रामविकास पॅनेलने बाजी मारली. अधिकाराव शेळके यांच्यासह तीन सदस्य निवडून आले. विरोधी पॅनेलचे दोन उमेदवार विजयी झाले. दोन्ही पॅनेल उंडाळकर गटाचे नेतृत्व मानतात.
येणपेत युवा आघाडीने मिळवल्या 6 जागा
येथे सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी होते. त्यामुळे मोठी चुरस पहायला मिळाली. सत्ताधारी श्री वाघजाई देवी रयत सहकार पॅनेल विरोधात युवा वर्गाचे स्वा.सै.शामराव मास्तर आण्णा परिवर्तन विकास आघाडी यांच्यात दुरंगी लढत झाली. तर सरपंच पदासाठी तिरंगी लढत झाली. सत्ताधारी गटातून रामचंद्र बाबू जगताप, परिवर्तन विकास आघाडीकडून लक्ष्मण रामचंद्र जाधव व अपक्ष युवराज आत्माराम जाधव अशी लढत झाली. यामध्ये रामचंद्र बाबू जगताप हे विजयी झाले. त्यांना 954 मते मिळाली. तर लक्ष्मण जाधव यांना 903 तर अपक्ष युवराज जाधव यांना 66 मते मिळाली.
दोन जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरीत 9 सदस्य पदासाठी व सरपंच पदासाठी निवडणूक झाली. 9 सदस्यांपैकी 6 सदस्य स्वा. सै. शामराव मास्तर आण्णा परिवर्तन विकास आघाडीचे निवडून आले. दोन्ही उंडाळकर गटाचे नेतृत्व मानतात.
हेळगावात सत्ता परिवर्तन
हेळगाव येथे आ. बाळासाहेब पाटील व आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गटांनी एकत्रित येत शेतकरी ग्रामविकास पॅनेल उभे केले होते. यांच्या विरोधात सर्वांनी एकत्रीत येत जनशक्त पॅनेल उभे केले होते. या दुरंगी लढतील शेतकरी ग्रामविकास पॅनेल विजयी झाले.पिंपरी येथे राष्ट्रवादी पुरस्कृत धवलक्रांती ग्रामविकास पॅनेलचे पाच सदस्य निवडून आले. संतोष वांगडे यांनी या पॅनलचे नेतृत्व केले होते. विरोधात सह्याद्रि विकास पॅनेल होते.सुशिला नवनाथ वांगडे या 47 मते मिळवून विजयी झाल्या. तर विरोधातील मुक्ता हणमंत वांगडे यांना 33 मते मिळाली. राजाराम वांगडे यांना 52 व विनोद सिताराम वांगडे यांना 49 मते मिळाली.
हे दोघेही निवडून आले.येथील मार्केट यार्ड मधील शासकीय धान्य गोदामात मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली. निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार अजित कुर्हाडे, मंडल अधिकारी युवराज पाटील, सर्व मंडल अधिकारी, तलाठी यांनी कामकाज पाहिले. सुनील काळेल यांनी सहाय्य केले.