होमपेज › Satara › ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन ‘ऑनलाईन’

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन ‘ऑनलाईन’

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 15 2018 12:16AM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

ग्रामपंचायतीमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वेळेत वेतन मिळत नसल्याने अडी-अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन ऑनलाइन पध्दतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा सातारा जिल्ह्यातील सुमारे 2 हजार 622 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना झाला आहे.

सातारा जिल्ह्यात सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्‍वर, जावली, कोरेगाव, खंडाळा, फलटण, माण, खटाव या 11 तालुक्यात सुमारे 1 हजार 495 ग्रामपंचायतीमध्ये 2 हजार 622 कर्मचारी कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या पगारावरच त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह  होत असतो. दररोज हे कर्मचारी गावात राब राबायचे. मात्र, पगार वेळेवर होत नसल्याने त्यांच्या समोर अनेक अडचणीचा डोंगर उभा रहायचा. तसेच कोणाकडून हात उसने पैसे घेवून, बँका, सहकारी संस्थांमधून  कर्ज काढून हे कर्मचारी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवताना दिसत होते. दर महिन्याला वेतनाची बोंबाबोंब होत होती. वेतनाबाबत ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने वेळोवेळी मोर्चे, आंदोलने केली. ग्रामविकास मंत्र्यांच्या बैठकीत संघटनेच्या पदाधिकार्‍यांची वेळोवेळी चर्चाही झाली होती.  राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची दखल राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने घेतली आहे. त्यानुसार  ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन  कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात   जमा करण्यात येणार असल्याचा निर्णय  शासनाने घेतला आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे  ग्रामपंचायत कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून  कर्मचार्‍यांचे रखडणारे पगार आता वेळेवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे.  या शासन निर्णयानुसार सर्व ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे बँकेत  खाते आधार कार्डशी संलग्न करून, त्यांचे वेतन, राहणीमान भत्त्यास परस्पर त्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने जमा करण्याच्या मागणीला  शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. 

ग्रामविकास विभाग व एच.डी.एफ.सी. बँक यांच्या संयुक्त माध्यमातून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दर महिन्याच्या 25 तारखेपर्यंत कर्मचार्‍यांची माहिती भरून गटविकास अधिकारी यांच्याकडून  खातरजमा करण्यात येणार आहे.