Wed, Aug 21, 2019 19:34होमपेज › Satara › आ. पाटील, हिंदुराव पाटील आमने- सामने

आ. पाटील, हिंदुराव पाटील आमने- सामने

Published On: May 05 2018 12:52AM | Last Updated: May 04 2018 9:11PMसणबूर : तुषार देशमुख

मंद्रुळकोळे आणि मंदुळकोळे खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून मंद्रुळकोळेचे दिग्गज माथाडी नेते आ. नरेंद्र पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील या निमित्ताने पुन्हा समोरा समोर येणार आहेत. 

ढेबेवाडी विभागाचा राजकीय केंद्रबिंदू असलेल्या आणि श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीवर गतवेळच्या निवडणुकीत आ. नरेंद्र पाटील व त्यांचे बंधू जि. प. सदस्य 
रमेश पाटील , सौ. डॉ. प्राची पाटील यांनी काँग्रेसच्या हिंदुराव पाटील गटाला 11/0 ने व्हाइट वॉश दिला होता. तर मंद्रुळकोळे खुर्दमध्ये हिंदुराव पाटील, युवा नेते अभिजीत पाटील, नितीन पाटील यांनी 7 पैकी 6 सदस्य निवडून आणत सलग वीस वर्षे सत्ता अबाधित राखून राष्ट्रवादीचे पाणीपत केले. 

आ. नरेंद्र पाटील व  हिंदुराव पाटील यांना दोन्ही पैकी प्रत्येकी एका  ग्रामपंचायतीवर यश मिळाले.  सलग पाच वर्षे या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये विभागातील इतर ग्रामपंचायतींसाठी रस्सीखेच सुरू होती. यामध्ये आ. नरेंद्र पाटील यांना चांगले यश आल्याचे पहायला मिळाले. मंद्रुळकोळे आणि खुर्दच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटने करत वर्षभरापासून या दोन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधूमाळी सुरू झाली आहे. गावापासून मुंबई पर्यंत मतदारांच्या गाठी भेटी, लग्‍नसमारंभ, वाढदिवस अशा कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावून कार्यकर्ता आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

आ. नरेंद्र पाटील, जि. प. सदस्य रमेश पाटील यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून मंंद्रुळकोळे आणि म. कोळे खुर्दमध्ये विकासकामे आणली तसेच माथाडीच्या माध्यमातून हजारो हातांना रोजगार दिला. हिंदुराव पाटील यांनी काँग्रेसच्या माध्यमातून विकास साधण्याचा प्रयत्न करून पतसंस्थेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी तसेच काँग्रेस पक्षाचे नेते प्रचारामध्ये सक्रीय झाले असताना ढेबेवाडी विभागात सर्वाधिक मतदान घेणारा आ. देसाई गट मात्र अद्याप शांत आहे. मंद्रुळकोळे आणि मंद्रुळकोळे खुर्दची निवडणूक आ. देसाई गट लढणार? की कोणाला पाठिंबा देणार ? का फक्त सरपंच पदाची निवडणूक लढविणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंद्रुळकोळेमध्ये निर्णायक मते आ. देसाई गटाकडे आहेत. त्यामुळे या गटाने निवडणूक लढवायची ठरवले तर याचा फटका कोणाला बसणार यावर देखील तर्क वितर्क लढवले जात आहेत. मंद्रुळकोळे आणि मं. कोळे खुर्दमध्ये सरपंच पद सर्वसाधारण पुरूष गटासाठी असल्याने येथे मोठी चुरस निर्माण झाली आहे. सरपंचपदाची उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले आहे. 

Tags : Satara, Gram Panchayat, election