होमपेज › Satara › मल्हारपेठ ग्रा. पं. निवडणुकीसाठी बैठका वाढल्या 

मल्हारपेठ ग्रा. पं. निवडणुकीसाठी बैठका वाढल्या 

Published On: May 09 2018 1:51AM | Last Updated: May 08 2018 7:28PMमारूल हवेली : धनंजय जगताप

राजकीय दृष्ट्या महत्वाची असणार्‍या मल्हारपेठ (ता. पाटण) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जोर बैठका वाढल्या असून पारंपरिक देसाई व पाटणकर गटाच्या लढतीत हर्षद कदम यांनी स्वतंत्र उडी घेतल्याने चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून  देसाई गटासह हर्षद कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हिरव्या पट्ट्यातील मल्हारपेठ ग्रामपंचायत राजकीय दृष्ट्या महत्वाची समजले जाते. या ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवण्यासाठी देसाई व पाटणकर गटांतर्गत नेहमीच अटीतटीची लढत पहावयास मिळते. या ग्रामपंचायतीवर देसाई गटाचे निर्विवाद वर्चस्व राहिले असून कदमवाडी येथील मतदान  महत्वाची भूमिका पार असल्याचे दिसून आले आहे.जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मोहनराव कदम यांचे पुत्र व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी मल्हारपेठ जि.प. गटातून उमेदवारी दिली होती. मात्र शिवसेनेच्या उमेदवारा विरोधात देसाई गटाने काम केल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. हर्षद कदम यांचा झालेला पराभव त्यांच्या समर्थकांच्या चागंलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे या पराभवाचा वचपा काढण्याच्या प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून होण्याची शक्यता असून तशी चर्चा सुरू आहे. देसाई व पाटणकर गटाच्या पारंपारिक लढतीत हर्षद कदम समर्थक उडी घेणार असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. 

दरम्यान ग्रामपंचायत कारभाराची चर्चा नेहमीच होत असते. गावातील स्थानिक समस्यांच्या बाबतीत ग्रामस्थांकडून अनेक प्रश्‍न उपस्थित केले जातात. त्यामुळे सत्ताधारी मंडळींना या प्रश्‍नांना निवडणूक निमित्ताने सामोरे जावे लागणार आहे. एकूण अकरा सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. चार वर्डातील होणार्‍या निवडणुकीत महादेव वार्ड क्रमांक 1 मध्ये नव्याने कदमवाडी परिसर समाविष्ट झाला असून हनुमान वॉर्ड क्र. 2 मध्ये हर्षद कदम यांचे प्राबल्य आहे. ज्योतिर्लिंग वॉर्ड क्र. 3 हा देसाई गटाचे तर विठ्ठल वॉर्ड क्र. 4 मध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. निवडणुकीच्या मैदानासाठी यापूर्वीच स्थानिक पुढार्‍यांनी तयारी केली असून हरकतीमुळे मतदान कमी झाले आहे. तर काही प्रमाणात नविन मतदान वाढलेले आहे. वाढीव मतदान व बदलेली वार्डाची रचना याचा परिणाम काय होणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.