होमपेज › Satara › राज्यपालांचे ‘महावस्त्र’ उदयनराजेंच्या गळ्यात

राज्यपालांचे ‘महावस्त्र’ उदयनराजेंच्या गळ्यात

Published On: Dec 18 2017 2:43AM | Last Updated: Dec 17 2017 10:49PM

बुकमार्क करा





सातारा : प्रतिनिधी

सातारा लोकसभा मतदार संघाचा उमेदवार कोण असणार, याविषयी चर्चा रंगत असताना रविवारी पुसेगावच्या सेवागिरी रथोत्सवाच्या निमित्ताने कोरेगावात आ. शशिकांत शिंदे यांच्या बंगल्यावर सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. शशिकांत शिंदे यांची खुमासदार चर्चा झाली. राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी सिक्कीमचे ‘महावस्त्र’ खा. उदयनराजेंच्या गळ्यात टाकले. तिघांनी एकत्रित पुसेगावपर्यंत प्रवासही केला. या प्रवासाची व पॉलिटिकल खुमासदारीची सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सातारा लोकसभा मतदार संघाची उमेदवारी कोणाला मिळणार? याविषयी जिल्ह्यात उत्सुकता आहे. खा. उदयनराजे भोसले हे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या तिकीटाचे प्रबळ दावेदार समजले जातात. मात्र, अधूनमधून विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर, राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद आ. शशिकांत शिंदे यांची नावे उमेदवार म्हणून घेतली जात असतानाच गेल्या काही दिवसांपासून अचानक श्रीनिवास पाटील यांचेही नाव चर्चेत येवू लागले आहे. लोकसभा निवडणुकीला अजून दीड वर्षे कालावधी असतानाच चर्चेच्या उलथापालथी मात्र सुरु आहेत. वास्तविक राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या डोक्यात खा. उदयनराजे हे फिट उमेदवार आहेत. उदयनराजेंनी भलेही राष्ट्रवादीतील जिल्ह्याच्या नेत्यांशी पंगा घेतला असला तरीही खा. शरद पवार  यांचे व उदयनराजे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. खा. शरद पवारांच्या सातारा जिल्हा दौर्‍यावेळी उदयनराजे कायम त्यांच्या सोबत राहतात. राजेंची जनमाणसातील क्रेझ यामुळे पवार यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक  असल्याचे अनेकदा बोलले जाते.  तरीही तिकीट वाटपाची चर्चा सुरुच असते. असे असतानाच सेवागिरी रथोत्सवाच्यानिमित्ताने रविवारी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील पुसेगावला निघाले होते. वाटेत आ. शशिकांत शिंदे यांच्या बंगल्यावर ते थांबले. सातार्‍यातून खा. उदयनराजे भोसले आपल्या समर्थकांसमवेत पुसेगावच्या रथोत्सवाला निघाले होते. श्रीनिवास पाटील कोरेगावात असल्याचे समजल्यानंतर खा. उदयनराजेही आ. शशिकांत शिंदे यांच्या बंगल्यावर गेले. या दिग्गज मंडळींची मग  खुमासदार चर्चा रंगली. श्रीनिवास पाटील हे तर फर्डे वक्ते म्हणून प्रसिद्ध. उदयनराजेंची हजरजबाबीपणाची स्टाईल लोकप्रिय आणि शशिकांत शिंदे चिमटे काढण्यात पटाईत,  त्याला जोड सोळशी बाळासाहेब सोळसकरांची.मग खुमासदारी रंगली नसेल तर नवलच. 

याच खुमासदारीत श्रीनिवास पाटील यांनी सिक्कीमचे ‘महावस्त्र’  उदयनराजेंच्या गळ्यात टाकले. त्यानंतर राज्यपालांच्याच गाडीत तिघेही एकत्रित गेले. मात्र या मैफिलीची जोरदार चर्चा सुरु झाली. 
यावेळी सारंग पाटील, सुनील काटकर, भास्कर कदम, श्रीमंत झांजुर्णे, संग्राम बर्गे, संजय शिंदे, इर्शाद बागवान, काका धुमाळ, जितेंद्र खानिवलकर व खा. उदयनराजेंचे समर्थकही उपस्थित होते.