Wed, Jun 26, 2019 11:23होमपेज › Satara › अरबी समुद्रातील शिवरायांच्या पुतळ्याची उंची सरकारने कमी केली : आ. चव्हाण

अरबी समुद्रातील शिवरायांच्या पुतळ्याची उंची सरकारने कमी केली : आ. चव्हाण

Published On: Mar 07 2018 11:27PM | Last Updated: Mar 07 2018 11:26PMकराड : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाबाबत शासनाकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा देखावा केला; पण अजूनपर्यंत काम सुरू झालेले नाही. प्रकल्प आराखडा बदलण्यात आला आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची 192 मीटरवरून ती वाढवून 210 मीटर इतकी करण्यात आली आणि हे जगातील सर्वात उंच स्मारक ठरेल, अशी जाहिरातदेखील विद्यमान सरकारने केली; परंतु दोन्ही प्रकल्प आराखड्यातील तरतुदींमध्ये पाहिले असता, स्मारकाची उंची वाढवण्याच्या नावाखाली शासनाने प्रत्यक्षात महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली आहे. तर पुतळ्याखालील चौथर्‍याची उंची वाढवली आहे.23 फेब्रुवारी 2015 रोजी केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने मूळ प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिली. 

त्यामधील तरतुदींनुसार पुतळ्याची उंची 160 मीटर, तर त्याखाली असलेल्या चौथर्‍याची उंची 32 मीटर अशी एकूण स्मारकाची उंची 192 मीटर प्रस्तावित करण्यात आली होती. 

23 डिसेंबर 2016 रोजी महाराष्ट्र शासनाने वरील प्रस्तावात सुधारणा केल्या. त्यानुसार पुतळ्याची उंची  160 मीटरऐवजी 126 मीटर आणि चौथर्‍याची उंची 32 मीटरऐवजी 84 मीटर केली. म्हणजेच महाराजांच्या धातूच्या पुतळ्याची उंची 34 मीटरने (112 फुटांनी) कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. 

प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरदेखील महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा प्रस्ताव का पाठवण्यात आला? 

सुधारित प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण खात्याची  पर्यावरणीय मान्यता अजूनपर्यंत मिळाली नाही हे खरे आहे का? राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला असल्याने महाराजांच्या ब्राँझच्या पुतळ्यावरील खर्चात कपात करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला होता का? महाराजांचे स्मारक असो की महाराजांच्या नावे राबविलेली कृषी कर्जमाफी योजना असो छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून अभिनिवेशी राजकारण करणे आणि राज्यातील सर्वसामान्य जनतेला भुलवत ठेवणे हेच सत्ताधारी पक्षाचे धोरण आहे, अशी टिकाही आ. चव्हाण यांनी केली आहे.