Sat, Jul 20, 2019 15:21होमपेज › Satara › कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नावर शासन उदासीन

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नावर शासन उदासीन

Published On: Mar 13 2018 1:44AM | Last Updated: Mar 12 2018 8:21PMपाटण : प्रतिनिधी

विविध मागण्यांसाठी कोयनानगर येथे सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या अंदोलनाला पंधरा दिवस उलटले तरी याबाबत गांभीर्याने विचार व ठोस कृती करण्यास शासन, प्रशासनाला वेळ नाही. तब्बल साठ वर्षात केवळ पंधरा टक्के प्रश्‍न सुटल्याचा दावा अंदोलनकर्ते करत आहेत. आजी, माजी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकाळात नक्की काय केले,हे जनतेसमोर यायलाच हवे, असा संतप्त सवाल प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला आहे. 

या आंंदोलनामुळे नवनवीन प्रश्‍न निर्माण होत आहेत. एकूण प्रश्‍नांपैकी आजवर 85 टक्के प्रश्‍न सुटले केवळ 15 टक्के प्रश्‍न प्रलंबित असल्याचा आजवरचा दावा चुकीचा असल्याचे अंदोलनाचे नेते तथा श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले आहे .  

या प्रकल्प निर्मितीवेळी प्रामुख्याने स्व. यशवंतराव चव्हाण व लोकनेते बाळासाहेब देसाई हे सक्रिय होते. त्यांच्या ’ खणाला खण व फणाला फण ’ या अश्‍वासनांवर विश्‍वास ठेवूनच या भूमिपुत्रांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग व संसारांची राखरांगोळी करून या जमीनी दिल्या होत्या. सन 1952 ते 1983 या प्रदीर्घ 31 वर्षांच्या कालखंडात स्वतः लोकनेते तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्यात विविध महत्त्वपूर्ण खात्यांचे मंत्रीही होते. वास्तविक त्याचकाळात या प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के प्रश्‍न निकालात निघायलाच पाहिजे होते, पण तसे घडले नाही. सन 1983 ते 2004 व 2009 ते 2014 या कालखंडात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर हे अनेक वर्षे लोकप्रतिनिधी व पाच वर्षे मंत्री होते. आ. शंभुराज देसाई हे सुध्दा कार्यरत आहेत. मग प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के प्रश्‍न का सुटले नाहीत हाच खरा प्रश्‍न आहे. ही मंडळी दावा करतात पंच्याऐंशी टक्के प्रश्‍न सुटलेत व अंदोलनकर्ते म्हणतात पंच्याऐंशी टक्के प्रलंबित तर मग यातील वस्तूस्थिती लोकांसमोर येण्याची गरज आहे. 

एरव्ही अगदी किरकोळ  कार्यक्रमांना जाण्यास लोकप्रतिनिधींना वेळ असतो मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून येथे भर उन्हात सुरू असणार्‍या अंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. काहीजन केवळ औपचारिकता म्हणून शरीराने गेले तर काहींनी तेवढेही औदार्य दाखविले नाही. केवळ सोपस्कार म्हणून कोणाला तरी पुढे करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. मात्र हे प्रकल्पग्रस्त कोणाच्या नेतृत्वाखाली अंदोलनाला बसले आहेत. याहीपेक्षा त्यांचा त्याग, बलीदान  याचा विचार होण्याची गरज आहे.